V Harish Influencer Death Pudhari
राष्ट्रीय

V Harish Influencer Death: 13 लाख फॉलोअर्स, 5 वर्षांची मेहनत आणि एक व्हिडीओ; लोकप्रिय फायनान्स इन्फ्लुएन्सरने आयुष्य का संपवलं?

V Harish Finance Influencer Death: हरीश यांच्या कुटुंबीयांनी सोशल मीडियावरील वाद, सायबर बुलिंग आणि मानसिक छळाचे आरोप केले असून, जेसन सॅम्युअल यांचे नाव तक्रारीत घेतले आहे.

Rahul Shelke

V Harish Finance Influencer Death: सोशल मीडियावर लोकांना आर्थिक सल्ला देणारे लोकप्रिय फायनान्स इन्फ्लुएन्सर व्ही. हरीश यांनी वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी आयुष्य संपवलं. चेन्नईतील एका भाड्याच्या व्हिलामध्ये ते मृतावस्थेत आढळले. त्यांच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावरील वाद आणि मानसिक छळाचे आरोप चर्चेत आले आहेत.

हरीश यांचे इन्स्टाग्रामवर 13 लाखांहून अधिक फॉलोअर्स होते. यूट्यूबच्या माध्यमातूनही ते लोकांना पैसे, गुंतवणूक आणि आर्थिक नियोजन याबाबत माहिती देत होते. गेल्या पाच वर्षांत त्यांनी सोशल मीडियावर स्वतःची ओळख निर्माण केली होती. मात्र, मृत्यूपूर्वी त्यांच्याविरोधात आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे समोर आले आहे.

हरीश यांच्या कुटुंबीयांनी सायबर बुलिंग आणि मानसिक छळाचे आरोप केले आहेत. या प्रकरणात त्यांनी जेसन सॅम्युअल नावाच्या एका इन्फ्लुएन्सरवरही आरोप केले आहेत. मात्र, सॅम्युअल यांनी हे आरोप फेटाळले असून, हरीश यांच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केले आहे. या प्रकरणाचा तपास सध्या पोलीस करत आहेत.

वादाची सुरुवात एका व्हिडीओमुळे?

हरीश यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 18 ऑक्टोबर रोजी जेसन सॅम्युअल यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध केला होता. या व्हिडीओमध्ये त्यांनी हरीश यांच्यावर फसवणूक केल्याचे आणि लोकांची दिशाभूल केल्याचे आरोप केले होते. तसेच, हरीश यांच्या आर्थिक सल्ला देण्याच्या कामावर आणि त्यासाठी आवश्यक परवाने आहेत की नाहीत, यावरही प्रश्न उपस्थित केले होते.

या आरोपांनंतर दोघांमधील वाद सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला. हरीश यांच्या कुटुंबीयांचा दावा आहे की, या वादानंतर त्यांचे इन्स्टाग्राम अकाउंट बंद करण्यात आले. या अकाउंटवर 13 लाखांहून अधिक फॉलोअर्स होते.

यानंतर हरीश यांनी नव्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून व्हिडीओ शेअर करण्यास सुरुवात केली. याच काळात त्यांनी स्वतःवरील आरोपांना उत्तर देणारा एक व्हिडीओ प्रसिद्ध केला होता.

‘पाच वर्षांची मेहनत हिरावून घेतली’

स्वतःवरील आरोपांना उत्तर देताना हरीश यांनी आपल्या पाच वर्षांच्या मेहनतीवर पाणी फिरल्याची भावना व्यक्त केली होती. आपण काही चुकीचे केले असेल, तर त्याबाबत प्रश्न विचारण्यास हरकत नाही, असेही त्यांनी म्हटले होते.

या व्हिडीओमध्ये हरीश यांनी आपल्याला धमक्या दिल्याचा आरोप केला. आयकर विवरणपत्र दाखल न केल्याच्या मुद्द्यावरून आपल्याला तुरुंगात जावे लागू शकते किंवा पैसे द्यावे लागतील, असे सांगण्यात आल्याचा दावा त्यांनी केला होता.

तसेच, आपला मानसिक छळ करण्यात आला आणि आपली प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न झाला, असा आरोपही त्यांनी केला होता. कोणत्याही समस्येला सामोरे जाताना आपली बाजू मांडणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी या व्हिडीओमध्ये सांगितले होते.

हरीश यांच्या मृत्यूनंतर जेसन सॅम्युअल काय म्हणाले?

हरीश यांच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर जेसन सॅम्युअल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर आपली प्रतिक्रिया दिली. या घटनेमुळे आपल्याला दुःख झाले असून आपण धक्क्यात असल्याचे त्यांनी म्हटले.

हरीश यांना सायबर बुलिंग केल्याचा आरोपही सॅम्युअल यांनी नाकारला. हरीश यांच्या मृत्यूला आपण कारणीभूत ठरावे, असा आपला कोणताही हेतू नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले.

आपण हरीश यांच्या वैयक्तिक आयुष्याऐवजी त्यांच्या व्यावसायिक कामकाजावर आणि आर्थिक सल्ला देण्यासाठी आवश्यक परवाने आहेत की नाहीत, यावर प्रश्न उपस्थित केले होते, असे सॅम्युअल यांनी सांगितले. हरीश यांनी आवश्यक परवाने घेऊन काम करावे, असेही आपण व्हिडीओमध्ये म्हटले होते, असा त्यांचा दावा आहे.

त्यामुळे या प्रकरणात सध्या दोन्ही बाजूंचे दावे समोर आले आहेत. हरीश यांच्या कुटुंबीयांनी मानसिक छळाचा आरोप केला आहे, तर सॅम्युअल यांनी हे आरोप फेटाळले आहेत.

हरीश यांच्या वडिलांची पोलिसांत तक्रार

हरीश यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वडिलांनी चेन्नईतील कनाथूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आपल्या मुलाला सतत मानसिक त्रासाचा सामना करावा लागल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत. सोशल मीडियावरील वाद, करण्यात आलेले आरोप, धमक्यांबाबतचे दावे आणि हरीश यांच्या मृत्यूशी संबंधित परिस्थिती याबाबत तपासातून अधिक माहिती समोर येण्याची अपेक्षा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT