राष्ट्रीय

चीनकडून सीमेजवळ लढाऊ विमाने, बॉम्बर

Arun Patil

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : चीनकडून सिक्कीमपासून 150 कि.मी. अंतरावरील सीमेजवळ अत्याधुनिक दर्जाची 250 लढाऊ विमाने तैनात करण्यात आली आहेत. भारतीय सीमेनजीक अण्वस्त्रवाहू बॉम्बरही सज्ज ठेवल्याची धक्कादायक माहिती उपग्रहीय सेवांद्वारे उघडकीस आली आहे.

27 मे रोजी चीनच्या कुरापती समोर आल्या आहेत. जे-20 ही अत्याधुनिक स्टिल्थ लढाऊ विमाने भारतीय हद्दीपासून अवघ्या 150 कि.मी. अंतरावर तैनात केल्याचे उपग्रहीय प्रतिमांद्वारे स्पष्ट झाले आहे. गुप्तचर यंत्रणांनीही 'ड्रॅगन'च्या विळख्याबाबत दुजोरा दिला आहे.

12 हजार 408 फूट उंचीवर असणार्‍या विमानतळानजीक चीनकडून सहा लढाऊ विमाने सज्ज ठेवण्यात आली आहेत.

चीनचे हे विमानतळ जगातील सर्वाधिक उंचीवरील आहे. तिबेटमधील शिगास्ते या ठिकाणी लष्करी आणि नागरी दळणवळणासाठी हे विमानतळ बनविण्यात आल्याचे चीनकडून सांगण्यात येते. ए-केज-500 या श्रेणीतील धोक्याचा इशारा देणारी विमानेही चीनने भारतीय हद्दीच्या जवळ तैनात ठेवली आहेत.

याआधीही चीनने 2020 आणि 2023 मध्ये भारतीय हद्दीजवळ अशाप्रकारची लढाऊ विमाने सज्ज ठेवली होती. हवेतून हवेतील लक्ष्यावर क्षेपणास्त्रातून हल्ला करण्याची क्षमता या विमानांत आहे. साधारणत:, 300 कि.मी. अंतरावर लक्ष्याचा भेद ही लढाऊ विमाने करू शकतात. अण्वस्त्रवाहू एच-6 बॉम्बरही भारतीय सीमेनजीक चीनने तैनात ठेवले आहेत. गेल्या पाच वर्षांपासून चीनकडून अशाप्रकारच्या संशयास्पद हालचाली सुरू आहेत.

SCROLL FOR NEXT