नवी दिल्ली : भारत-बांगलादेश सीमेची एकूण लांबी ४०९६.७ किलोमीटर इतकी असून त्यापैकी ३२३२.२१८ किलोमीटर क्षेत्रावर कुंपण घालण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. सीमेच्या जवळपास ८६४.४८२ किलोमीटर लांबीचे कुंपण अद्याप बाकी आहे, असे त्यांनी सांगितले. तृणमूल काँग्रेसच्या खासदार सजदा अहमद यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना ही माहिती गृह मंत्रालयाने दिली.
सीमांचे रक्षण करण्याकरता सीमेलगत कुंपण घालणे हा एक अतिशय महत्वाचा सुरक्षा उपाय आहे. कुंपण घालण्यामुळे सीमा पार गुन्हेगारी कारवाया, तस्करी, गुन्हेगारांचा संचार आणि शस्त्रास्त्रांची तस्करी इत्यादी आव्हाने प्रभावीपणे हाताळून सीमाभाग गुन्हेगारीमुक्त राखण्यात मदत होते, असे गृहमंत्री राज्यमंत्री म्हणाले.
गृह राज्यमंत्री म्हणाले की, सीमेवरील सुरक्षेच्या उपाययोजनांसंदर्भात कुंपण घालण्यासह, भारत दोन्ही सरकारांमधील आणि दोन्ही देशांच्या सीमा सुरक्षा दलांमधील सर्व प्रोटोकॉल आणि करारांचे पालन करेल असे बांगलादेश सरकारला कळवण्यात आले आहे. बांगलादेशच्या वतीने याआधीच्या सर्व नियमांची अंमलबजावणी केली जाईल. तसेच सीमेपलीकडील गुन्हेगारी कारवाया रोखण्यासाठी सहकार्यपूर्ण दृष्टिकोन बाळगला जाईल अशी भारताची अपेक्षा असल्याचे देखील बांगलादेश सरकारला कळवण्यात आले आहे.
गृह राज्यमंत्री म्हणाले की, भारत-बांग्लादेश सीमेलगत अद्याप ८६४.४८२ किलोमीटर लांबीचे कुंपण घालायचे असून यामध्ये १७४.५१४ किलोमीटर लांबीच्या अव्यवहार्य टप्प्याचा समावेश आहे. कुंपण घालण्याचा प्रकल्प पूर्ण करताना भू संपादन, बॉर्डर गार्ड बांगलादेशने (बीजीबी) घेतलेल्या हरकती आणि आक्षेप, कामासाठी आवश्यक मर्यादित हंगाम आणि भूस्खलन/दलदलीच्या जमिनीशी संबंधित आव्हानांना सामोरे जावे लागते, असे ते म्हणाले.