Maharashtra students crack UPSC
नवी दिल्ली: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या महाराष्ट्र राज्यातील ८४ विद्यार्थ्यांचा सत्कार येत्या मंगळवारी दिल्लीत होणार आहे. या कार्यक्रमासाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी आणि केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे सचिव संजय कुमार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असणार आहेत. दिल्लीस्थित मराठी अधिकाऱ्यांची संस्था 'पुढचे पाऊल'च्या माध्यमातून हा कार्यक्रम होणार आहे. यंदाचे या कार्यक्रमाचे सातवे वर्ष आहे.
या कार्यक्रमाच्या संदर्भात भारतीय परराष्ट्र सेवेतील निवृत्त अधिकारी आणि राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचे सल्लागार ज्ञानेश्वर मुळे, केंद्रीय शिक्षण मंत्रालयातील अतिरिक्त सचिव आनंद पाटील, लँड पोर्ट प्राधिकरणाच्या वित्त सदस्य रेखा रायकर, ज्ञानेश्वर वीर यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. दरम्यान, या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात दिल्लीसह देशभर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी गुणवंतांशी थेट संवाद साधणार आहेत. दुसऱ्या सत्रात प्रमुख अतिथी उपस्थितांना मार्गदर्शन करतील. ऑनलाईन माध्यमातूनही हा कार्यक्रम देशभरातील लोकांना पाहता येईल. राज्यातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात प्रशासकीय सेवेत यावेत, यासाठी पुढचे पाऊल संस्था विद्यार्थ्यांना गेली २ दशके मार्गदर्शन करत आहे.
या कार्यक्रमात सशस्त्र सीमा बलाच्या अतिरिक्त महासंचालक अनुपमा निळेकर चंद्रा आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाचे अतिरिक्त महासंचालक पद्माकर रणपिसे यांचाही सत्कार होणार आहे. ज्ञानेश्वर मुळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. ज्ञान प्रबोधिनी पुणे येथील विवेक कुलकर्णी, सविता कुलकर्णी यांची देखील कार्यक्रमाला उपस्थिती असणार आहे.
यावेळी बोलताना ज्ञानेश्वर मुळे म्हणाले की, केंद्र सरकारच्या विविध विभागांच्या विविध योजना आहेत. महाराष्ट्र राज्याला या योजनांचा फायदा अधिकाधिक व्हावा, त्या संदर्भातील माहिती मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विविध मंत्रालयांच्या योजनांची माहिती राज्यातील सर्व लोकसभा-राज्यसभा खासदारांना सखोलपणे होण्यासाठी दिल्लीत विविध विभागात कार्यरत सर्व अधिकारी आणि महाराष्ट्रातील सर्व खासदार यांचा एक संवाद कार्यक्रम आयोजित करण्याचा मानस आहे, लवकरच अशा प्रकारचा कार्यक्रम घेऊ, असेही ते म्हणाले.