अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबाद जिल्ह्यातील एका गावातून अत्यंत दुःखद आणि अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. येथे एका व्यक्तीने आपल्या १० वर्षांच्या मुलाचे डोके घरात देवीच्या वेदीवर कथितपणे आपटून त्याची हत्या केली आणि त्यानंतर मृतदेहाजवळच खाटेवर झोपला. पोलिसांनी नरेश पटेल नावाच्या या निर्दयी बापाला बेड्या ठोकल्या.
साणंदच्या विंछिया गावात रविवारी रात्री हे भयंकर कांड घडले. साणंदचे पोलिस निरीक्षक जयप्रकाश चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतमजूर असलेल्या नरेशची पत्नी भारताबेन १० दिवसांपूर्वी त्याच्याशी भांडणानंतर माहेरी निघून गेली होती. भारताबेनने नोंदवलेल्या तक्रारीनुसार, नरेशने करण या आपल्या एकुलत्या मुलाचा देवीच्या वेदीवर बळी दिल्याची माहिती दिली. आपल्यानंतर कुटुंबातील कोणीही ‘भुवा’ (स्थानिक समुदाय व देवी-देवतांमधील मध्यस्थाची भूमिका बजावणारा पारंपरिक विधी करणारा) बनू नये, म्हणून हे कृत्य केल्याचे नरेशने सांगितले.
नरेशची मानसिक स्थिती ठीक नाही. पत्नी करणची शाळा असल्याने त्याला सोडून माहेरी गेली होती. याच काळात नरेशने घरातील देवीच्या छोट्या वेदीवर करणचे डोेके आपटून त्याला ठार केले. नंतर त्याच्या मृतदेहाजवळच खाटेवर झोपून गेला. रविवारी रात्री शेजाऱ्याने फोन करून भारताबेनला घटनेची माहिती दिली. रात्री साडेनऊ वाजता ती परतल्यावर तिला करणचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह खाटेवर पडलेला आढळला. त्याच्या कपाळावर दुखापतीच्या खुणा होत्या.
नरेशचे वडील देवीचे ‘भुवा’ होते. नंतर नरेशनेही ही भूमिका स्वीकारली होती. पुढे मुलासह कुटुंबातील कोणीही ‘भुवा’ बनू नये, अशी इच्छा असल्याने नरेशने करणचे पाय पकडून त्याला देवीच्या वेदीसमोर २-३ वेळा आपटले. यातच त्याचा मृत्यू झाला, असे भारताबेनने तक्रारीत म्हटले आहे.