पुढारी ऑनलाईन डेस्क : मुलीने कुटुंबाच्या विरोधात जावून प्रेमविवाह केल्याने निराश झालेल्या वडिलांनी जीवन संपवल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर येथे घडली. त्यांनी जीवन संपविण्यापूर्वी लिहिलेल्या पत्रात मुलीच्या कृत्यावर खंत व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी एक हतबल वडिलांची वेदनाही मांडली आहे.
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये बुधवारी (दि. ९ एप्रिल) रात्री उशिरा एका औषध दुकानाचे मालक ऋषिराज उर्फ संजू जयस्वाल यांनी गोळी झाडून जीवन संवपले. गोळीचा आवाज ऐकल्यानंतर कुटुंबातील सदस्यांना त्याच्या बेडरूमकडे धाव घेतली असता त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले.
या प्रकरणी ग्वाल्हेरचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक कृष्णा लालचंदानी यांनी माहिती दिली की, ऋषिराज यांची मोठी मुलगी सुमारे १५ दिवसांपूर्वी शेजारच्या एका तरुणासोबत घरातून निघून गेली होती. तिला इंदूरला शोधून परत आणण्यात आले. त्यानंतरच्या न्यायालयीन सुनावणीदरम्यान, मुलीने सांगितले की तिचे कायदेशीररित्या लग्न झाले आहे आणि तिने तिच्या पतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
ऋषिराज यांनी जीवन संपविण्यापूर्वी मुलीच्या आधार कार्डच्या प्रिंटआउटवर एक चिठ्ठी लिहिली होती. या चिठ्ठीत त्यांनी लिहिले की, "हर्षिता, तू चूक केलीस, मी जात आहे. मी तुम्हा दोघांनाही ठार मारू शकलो असतो, पण मी माझ्या मुलीला कसे मारु शकलो असतो. मुली, तू जे केले ते बरोबर नव्हते. जो वकील काही पैशांसाठी संपूर्ण कुटुंबाचा बळी देतो. त्यालाही मुली नाहीत का? त्याला वडिलांचे दुःख समजत नाही का? एक संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे आणि आता समाजात काहीही शिल्लक नाही."
ऋषिराज यांनी या चिठ्ठीत कायदेशीर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत लिहिलं आहे की, "आर्य समाजाअंतर्गत विवाह वैध नसेल तर न्यायालय मुलीला तिच्या जोडीदारासोबत कसे जाऊ देते? यामुळे आमचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. माझे दुःख कोणीही समजले नाही."
या प्रकरणी अतिरिक्त पोलिस अधीक्षक निरंजन शर्मा म्हणाले, "ही एक अत्यंत दुःखद घटना आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे. मुलीने आंतरजातीय तरुणाशी विवाह केला होता. यामुळे वडील ऋषिराज काही दिवसांपासून नैराश्यात होते. घटनेच्या आधीच्या दिवसांत ते अस्वस्थ होतेजीवन संपविण्यापूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठी यांची चिंता स्पष्ट होते. ऋषिराज यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी आहे." दरम्यान ऋषिराज यांनी जीवन संपविल्यानंतर त्यांच्या संतप्त नातेवाईकांनी त्यांच्या मुलीशी लग्न करणाऱ्या तरुणाच्या वडिलांवर हल्ला केला. त्यांना बेदम मारहाण केली. प्रत्यक्षदर्शींनी हस्तक्षेप करत त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.