नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पंजाब आणि हरियाणामधील शेतकरी आता १४ डिसेंबरला दिल्लीकडे कूच करणार आहेत. १०१ शेतकऱ्यांची एक तुकडी राजधानी दिल्लीकडे येणार आहे. सरकारवर दबाव आणून त्यांच्या समस्या मांडण्याचा ते प्रयत्न करणार आहेत. दरम्यान, शेतकरी आंदोलनाला बळ देण्यासाठी शेतकरी संघटना सर्वसमावेशक रणनीती तयार करत आहेत.
शेतकरी नेते सर्वनसिंह पंढेर यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, आता शेतकरी १४ डिसेंबरला दिल्लीकडे कूच करणार आहेत. आंदोलनाला ३०३ दिवस उलटले आहेत. आम्ही चर्चा करण्यास तयार आहोत मात्र, सरकारकडून अद्याप कोणताही संपर्क झालेला नाही, असेही ते म्हणाले.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काही शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. या आमरण उपोषणाला १५ दिवस उलटून गेले तरीही आतापर्यंत सरकारने चर्चेसाठी निमंत्रण दिले नाही. काही उपोषणकर्त्या शेतकऱ्यांची प्रकृती खालावल्याचे समजते. शेतकऱ्यांनी १४ डिसेंबरला दिल्लीकडे कूच करणार असल्याचे म्हटल्यावर केंद्र सरकार चर्चेसाठी निमंत्रण देणार का, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.