भोपाळ; वृत्तसंस्था : आंतरराष्ट्रीय कीर्तीचे थोर उर्दू कवी, लेखक आणि पद्मश्री पुरस्कार विजेते डॉ. बशीर बद्र यांचे गुरुवारी भोपाळमधील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. आधुनिक उर्दू गझलचा एक सर्वात प्रभावी आणि बुलंद आवाज मानले जाणारे बशीर बद्र 91 वर्षांचे होते. गेल्या काही वर्षांपासून ते दीर्घ आजारपण आणि स्मृतिभ्रंशाने त्रस्त होते.
बशीर बद्र यांच्या गझलांमधील शब्दांचा साधेपणा आणि मनाला भिडणारी भावनिक खोली यामुळे त्यांनी आधुनिक गझल प्रकाराला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. सर्वसामान्य माणसाला समजेल अशा सोप्या भाषेत त्यांनी गझल लिहिली. त्यांनी 1972 मध्ये (शिमला कराराच्या पार्श्वभूमीवर) लिहिलेला एक प्रसिद्ध शेर “दुश्मनी जम कर करो...“ हा आजही भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेदना आणि संघर्षाचे प्रतिबिंब म्हणून ओळखला जातो. संसदेपासून ते राजकीय सभांपर्यंत अनेक दिग्गज नेत्यांनी त्यांच्या शेरो-शायरीचा आपल्या भाषणात वारंवार वापर केला आहे.
15 फेब्रुवारी 1935 रोजी उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे बशीर बद्र यांचा जन्म झाला. 1987 मध्ये मेरठमध्ये झालेल्या भीषण जातीय दंगलीत त्यांचे घर आणि सर्वकाही जळून खाक झाले होते. या दुर्दैवी घटनेनंतर त्यांना मेरठ सोडावे लागले आणि ते मध्य प्रदेशातील भोपाळ येथे येऊन स्थायिक झाले. त्यांनी आपले उच्च शिक्षण प्रसिद्ध अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीमधून पूर्ण केले. पुढे 1974 ते 1990 या काळात त्यांनी मेरठ कॉलेजमध्ये उर्दूचे प्राध्यापक म्हणून काम केले. त्यांच्या लेखनात सामाजिक समता, धर्मनिरपेक्षता आणि विविधतेत एकता या मूल्यांचा नेहमीच आग्रह असायचा. उर्दू साहित्यातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल भारत सरकारने 1999 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते.
“लोग टूट जाते हैं एक घर बनाने में, तुम तरस नहीं खाते बस्तियाँ जलाने में।”
“उजाले अपनी यादों के हमारे साथ रहने दो, ना जाने किस गली में ज़िन्दगी की शाम हो जाए।”