नवी दिल्ली : राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. देवेंद्र फडणवीसच आता राज्याचे नेतृत्व करतील, हे स्पष्ट आहे. मात्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री होण्याने ते ज्या पक्षातून येतात त्या भारतीय जनता पक्षामध्ये काही समीकरणे बदलू शकतात. या समीकरणांमुळे केवळ राज्य भाजपमध्ये नव्हे तर केंद्रीय भाजपमध्येही काही नव्या गोष्टी उदयास येऊ शकतात. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यानंतर जेव्हा जेव्हा राष्ट्रीय अध्यक्ष पदाची चर्चा झाली तेव्हा जी नावे प्रामुख्याने आली त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचेही एक नाव होते. आता फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आल्यानंतर या शर्यतीतून त्यांचे नाव हे आपसूकच बाहेर झाले.
एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रासारखे एक महत्त्वाचे आणि मोठे राज्य भाजपला मिळाले आहे. यापूर्वीही महाराष्ट्रात भाजपप्रणित महायुतीची सत्ता होती. मात्र मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे होते. यावेळी मुख्यमंत्रीपद भाजपकडे आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. केवळ महाराष्ट्रासाठी नव्हे तर सबंध देशासाठी आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या गोष्टी अनेक या शहरातून होतात. त्यामुळे देशात भाजप वाढवण्यासाठी जी रसद लागणार आहे ती देखील आता महाराष्ट्रातून मुक्तहस्तपणे पुरवली जाणार आहे.
यापूर्वीच देवेंद्र फडणवीस भाजपच्या केंद्रीय निवडणूक समिती सदस्य आहेत. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर फडणवीस यांना पक्षाने आधीच प्रतिनिधित्व दिले आहे. मात्र देशपातळीवर भाजपशासित राज्यांचे सक्रिय मुख्यमंत्री म्हणूनही त्यांच्याकडे बघितले जाईल. सध्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव हे दोन मुख्यमंत्री राज्याच्या राजकारणापलीकडे राष्ट्रीय राजकारणात सक्रिय मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात. या यादीत देवेंद्र फडणवीस पहिल्या क्रमांकावर येऊ शकतात.
देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेते असताना किंवा उपमुख्यमंत्री असतानाही त्यांनी लोकसभा निवडणुकीसह दरम्यानच्या काळात राज्याबाहेर झालेल्या सर्व निवडणुकींमध्ये प्रचार केला. यापुढे देवेंद्र फडणवीस पुन्हा नव्या जोमाने देशभरात भाजपचा प्रचार करतील. त्यामुळे पुढच्या पाच वर्षाच्या काळात जितक्या विधानसभा निवडणुका होतील. त्या सर्व निवडणुकांमध्ये देवेंद्र फडणवीस हे देखील भाजपाचे एक प्रमुख प्रचारक नक्की असतील.
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उत्तम वक्तृत्व, विविध विषयांचा गाढा अभ्यास, सर्व प्रकारच्या लोकांना समायोजित करून घेण्याची क्षमता, समयसुचकता, स्वच्छ प्रतिमा, मराठी, हिंदीसह इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, समाजातील सर्व वर्गांना आपला आणि कार्यक्षम वाटणारा माणूस असे अनेक गुण आहेत. त्यामुळे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर राहतीलच मात्र पक्षसंघटनेत राष्ट्रीय नेते म्हणूनही मोठी कामगिरी बजावतील.