aaj tak
पुढारी ऑनलाईन डेस्क - आंध्र प्रदेशचा प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हर्ष साईंच्या नावाने व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये असा दावा केला जात आहे की, ज्यामध्ये लोकांना १ ते १५ लाख रुपयांपर्यंत मदत केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती म्हणतो, "तुमचा हर्ष भैया बोलत आहे. मी भारतातील माझ्या बहिणी आणि भावांना मदत करत आहे ज्यांना १ लाख ते १५ लाख रुपयांपर्यंत पैशांची गरज आहे. ज्यांना घर बांधायचे आहे, मी त्यांना पैशाची मदत करत आहे. घरे बांधायला. मी मदत करतोय."
या व्हिडीओमध्ये हर्ष साईचे अनेक फोटो आहेत, ज्यात काहींमध्ये तो पैशांच्या ढिगाजवळ उभा राहून थम्स-अप देत आहे, तर दुसऱ्या फोटोमध्ये तो त्याच्या मागे ठेवलेल्या नोटांच्या बंडलांकडे बोट दाखवत आहे.
व्हिडिओमध्ये मोठ्या मोठ्या अक्षरांमध्ये 'यूके टू इंडिया' आणि 'ऑल इंडिया हेल्प' देखील लिहिलेले आहे. अशा प्रकारचे व्हिडिओ हर्ष साईच्या नावाने अनेक फेसबुक पेजवर आहेत, जसे की 'Harsha sign 4' , 'Harsha Sai 5' , 'Harsha Sai 7' , और 'Harsha Sai 8' वर पोस्ट करण्यात आले आहेत.
आज तक फॅक्ट चेकमध्ये असे आढळून आले की, ज्या फेसबुक पेजवर आर्थिक मदतीचे आश्वासन देणारे हे व्हिडिओ पोस्ट करण्यात आले आहेत ते हर्ष साईचे नाही. ही एक प्रकारची फसवणूक आहे, ज्याद्वारे लोकांची पैशांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला जातोय.
व्हायरल पोस्टमध्ये लोकांना व्हॉट्सॲप लिंकवर क्लिक करण्यास सांगितले आहे. आम्ही अशा चार पोस्टमध्ये उपस्थित असलेल्या लिंकवर क्लिक केले. या चौघांवर '+92' ने सुरू होणाऱ्या पाकिस्तानच्या व्हॉट्सॲप नंबरचे चॅट उघडले. आज तक फॅक्ट चेक रिपोर्टरने यापैकी एका नंबरवर फोन केला असता एका तरुणाने फोन उचलला. रिपोर्टरने त्याला फूड बिजनेस सुरु करण्यासाठी दहा लाख रुपयांची गरज असल्याचे सांगितले. काही प्रश्न विचारल्यानंतर त्या तरुणाने सांगितले की, आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करू. पण रुपये डॉलरमध्ये पाठवले जातील आणि त्याचे रुपांतर रुपयात करण्यासाठी सरकारी फी भरावी लागेल. हे शुल्क सुमारे तीन हजार रुपये असेल.
त्यानंतर तरुणाने रिपोर्टरला व्हॉट्सॲप नंबरवर एक व्हॉईसनोटच्य़ा माध्यमातून कन्व्हर्जन चार्ज जमा करण्यास सांगितले. त्याचे स्क्रीनशॉट पाठवण्यास सांगितले. तसेच तो म्हणाला की, स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तो लाईव्ह कॉलच्या दरम्यान, १० लाख रुपये त्या रिपोर्टरच्या बँक अकाऊंटमध्ये ट्रान्सफर करेल.
त्यानंतर तरुणाने रिपोर्टरला अनेक वेळा फोन करून कन्व्हर्जन चार्ज लवकरात लवकर जमा करून स्क्रीनशॉट पाठवण्यास सांगितले. कारण तो बँकेत उभा असल्याचे सांगितले. आपला मुद्दा पटवून देण्यासाठी त्याने रिपोर्टरला दोन व्हिडिओही पाठवले. यातील एक व्हिडिओ परदेशातील बँकेचा आहे. तर, दुसरा व्हिडिओ स्टेट बँक ऑफ गुजरातचा असल्याचे दिसते. कारण त्यात स्टेट बँकेचा लोगो दिसत आहे आणि गुजराती भाषेत काहीतरी लिहिलेले आहे.
पाकिस्तानी क्रमांक असलेल्या तरुणाने कन्व्हर्जन चार्ज जमा करण्यासाठी रिपोर्टरला एक क्यूआर कोडही पाठवला, जो अविजित दास नावाच्या तरुणाच्या खात्याशी संबंधित आहे. हे ठामपणे सांगता येत नसले तरी भारत आणि पाकिस्तानमधील काही लोक मिळून हर्ष साईच्या नावावर लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असल्याची शक्यता आहे.
आम्हाला मे २०२४ च्या द न्यू इंडियन एक्स्प्रेसचा एक अहवाल सापडला, ज्यानुसार, त्यावेळी तमिळनाडूच्या वेल्लोर पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने लोकांना हर्ष साईच्या नावाने फसवणूक करणाऱ्या अशा फसवणुकीपासून सावध राहण्याचा इशारा दिला होता. त्यावेळी अशाच एका भामट्याने हर्ष साईच्या नावाने महिलेची ६ लाख ७२ हजार रुपयांची फसवणूक केली होती.
डिसेंबर २०२४ मध्ये, तेलंगणाच्या काराकागुडेमच्या पोलिसांनी लोकांना हर्षच्या नावावर या प्रकारच्या फसवणुकीबद्दल सतर्क केले होते.
हर्ष साईं आंध प्रदेशातील प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे, जो लोकांची मदत करण्यासाठी इंटरेस्टिंग व्हिडिओ बनवतो. कधी तो गरीब कुटुंबाला सुट्टीवर केरळला पाठवून त्याचे घर आणि दुकान बांधून देतो तर कधी गरिबांसाठी पंचतारांकित हॉटेल उघडण्याचा दावा करतो. ही बातमी लिहिपर्यंत हर्षचे इन्स्टाग्रामवर १७.७ दशलक्ष फॉलोअर्स होते.
सप्टेंबर २०२४ मध्ये हर्षविरुद्ध बलात्कार आणि ब्लॅकमेलिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुंबईतील एका अभिनेत्रीने त्याच्यावर हे आरोप केले होते. वृत्तानुसार, यानंतर तो फरार झाला होता आणि पोलीस त्याचा शोध घेत होते. आम्ही याविषयी माहिती घेण्यासाठी हर्षशी संपर्क केला. त्याचे उत्तर आल्यानंतर ती माहिती वृत्तात अपडेट केली जाईल.
निष्कर्ष : पडताळणीतून हे सिद्ध होतं की, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हर्ष साईंच्या नावावर फसवणूक होत असून काही ठग लोकांकडून पैसे उकळण्याचे प्रयत्न करत आहेत.
This story was originally published by aajtak {https://www.aajtak.in/fact-check/story/fact-check-fraud-being-done-in-name-social-media-influencer-harsh-sai-fraudsters-have-connection-with-pakistan-ntc-rptc-2151160-2025-01-25}, and republished by Pudhari as part of the Shakti Collective