Modi-Trump talks | मोदी-ट्रम्प चर्चेत एलन मस्क यांचा कोणताही हस्तक्षेप नाही 
राष्ट्रीय

Modi-Trump talks | मोदी-ट्रम्प चर्चेत एलन मस्क यांचा कोणताही हस्तक्षेप नाही

परराष्ट्र मंत्रालयाने फेटाळला अमेरिकन माध्यमाचा दावा

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात 24 मार्च रोजी झालेल्या महत्त्वपूर्ण टेलिफोनिक चर्चेबाबत अमेरिकन वृत्तपत्र ‘न्यूयॉर्क टाईम्स’ने केलेला दावा भारत सरकारने पूर्णपणे फेटाळून लावला आहे. या चर्चेमध्ये अब्जाधीश उद्योगपती एलन मस्क यांचा सहभाग होता, असे वृत्त या वृत्तपत्राने दिले होते. मात्र, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी स्पष्ट केले की, ही चर्चा केवळ दोन देशांच्या प्रमुखांमध्येच झाली असून त्यात तिसर्‍या कोणाचाही सहभाग नव्हता.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ‘न्यूयॉर्क टाईम्स’चा अहवाल तथ्यात्मकद़ृष्ट्या चुकीचा आहे. 24 मार्च रोजी झालेली चर्चा केवळ पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यातच झाली. या चर्चेचा केंद्रबिंदू पश्चिम आशियातील बिघडलेली परिस्थिती हा होता.

शांततेसाठी भारत कटिबद्ध

चर्चेनंतर सोशल मीडियावरून माहिती देताना पंतप्रधानांनी सांगितले की, भारत या प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांचे समर्थन करतो. व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिव लेविट यांनीही ही चर्चा सकारात्मक आणि अर्थपूर्ण असल्याचे म्हटले आहे. 28 फेब्रुवारी रोजी इराण संकट सुरू झाल्यानंतर मोदी आणि ट्रम्प यांच्यातील ही पहिलीच थेट चर्चा होती.

‘होर्मुझ’बद्दल चिंता

इराणकडून होर्मुझ सामुद्रधुनीवर वाढवण्यात आलेल्या नियंत्रणाबद्दल दोन्ही नेत्यांनी चिंता व्यक्त केली. हा सागरी मार्ग जागतिक ऊर्जा पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असून, तिथे निर्माण झालेल्या संकटामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. याचा फटका जागतिक बाजारपेठेला बसत असल्याने, हा मार्ग सुरक्षित आणि खुला राहणे जगाच्या हिताचे असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT