पुढारी ऑनलाईन डेस्क: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तिरुअनंतपुरमचे खासदार शशी थरूर सध्या चर्चेत आहेत. काँग्रेस पक्षात ते नाराज असल्याचे सांगितले जात असून भाजपशी त्यांची जवळीक वाढू लागल्याची चर्चा आहे. शुक्रवारीच भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जय पांडा यांनी थरूर यांच्यासोबतचा विमान प्रवासातील फोटो शेअर करत आम्ही एकाच प्रवास करत असल्याचे म्हटले होते. त्यातच आता परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी थरूर यांचे कौतुक करून त्यांच्या भाजपमध्ये जाण्याबाबतच्या चर्चांना आणखी बळ दिले आहे. (S Jaishankar on Shashi Tharoor)
शनिवारी एका कार्यक्रमात एका प्रश्नाच्या उत्तरात जयशंकर म्हणाले की, "सरकारसंबंधी विषयांमध्ये काँग्रेस नेते शशी थरूर यांना असलेली जाण आणि त्यांच्या निर्णयांचा मी नेहमीच आदर केला आहे. ते जेव्हा आमचे कौतूक करतात तेव्हा मी त्यांच्या जाणीवेचे कौतूक करतो. दरम्यान, एस. जयशंकर यांचे हे वक्तव्य थरूर यांनी नुकतेच युक्रेन-रशिया युद्धाबाबत केलेल्या वक्तव्यावरून आले आहे.
नुकतेच दिल्लीत झालेल्या रायसीना डायलॉगमध्ये थरूर यांनी म्हटले होते की, युक्रेन-रशिया युद्धात भारताच्या धोरणाला विरोध करून मी चूक केली होती. तीन वर्षांनंतर मला जाणवत आहे की, की मी चुकीचा होतो. कारण स्पष्ट आहे.
भारताच्या धोरणामुळे देशाला एक महत्त्वाची भूमिका बजावण्याची संधी मिळाली आहे. आमचे पंतप्रधान यूक्रेन आणि रशिया दोन्ही देशांच्या राष्ट्राध्यक्षांना भेटू शकतात, दोघांना मिठी मारू शकतात. आणि त्या दोन देशांनाही ते मान्य आहे."
जयशंकर म्हणाले की, युद्ध परिस्थितीकडे भारताने पूर्णतः निष्पक्षपणे पाहिले. या संघर्षाच्या कारणांचा आणि जागतिक परिस्थितीचा आम्ही वस्तुनिष्ठ पद्धतीने विचार केला. आम्हाला इतर अनेक देशांप्रमाणे भावनिक होऊन असे निर्णय घ्यायचे नव्हते, त्यामुळे आमच्या धोरणावर परिणाम झाला असता.
भारत सरकार केवळ यूक्रेन युद्धावरच नव्हे, तर जागतिक घडामोडींवरही कोणताही पूर्वग्रह न ठेवता अत्यंत संतुलित दृष्टीकोन ठेवते.पंतप्रधान मोदींच्या व्यापक संबंधांचा, त्यांच्या अनुभवाचा आणि या संबंधांमधून मिळणाऱ्या फायद्यांचा आता ठोस परिणाम दिसू लागला आहे, असेही ते म्हणाले.