राष्ट्रीय

केजरीवालांची जामीन याचिका खारीज, न्यायालयीन कोठडीत १९ जूनपर्यंत वाढ

Shambhuraj Pachindre

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अंतरिम जामीन मुदतीत वाढ करण्याच्या मागणीसाठी दाखल केलेली याचिका राऊस एव्हेन्यू न्यायालयाने बुधवारी (दि.५) खारीज केली. केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत १९ जूनपर्यंत वाढ करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला होता. त्याची मुदत संपताच केजरीवाल यांनी २ जून रोजी आत्मसमर्पण केले होते. त्यानंतर वैद्यकीय कारणावरून अंतरिम जामीनात ७ दिवसांची मुदतवाढ देण्याची मागणी केजरीवाल यांनी केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली होती. आता राऊस एव्हेन्यू न्यायालयानेही त्यांना जामीन देण्यास नकार दिला.

ही याचिकाही राऊस अव्हेन्यू न्यायालयाने फेटाळली. ईडीने या प्रकरणी अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्याची मागणी केली होती. यावरही न्यायालयाने निर्णय सुनावत १९ जूनपर्यंत कोठडीत वाढ केली. तसेच त्यांच्या आवश्यक वैद्यकीय चाचण्या करण्याचे निर्देशही न्यायालयाने संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. या प्रकरणात डिफॉल्ट जामीन मिळावा यासाठी अरविंद केजरीवाल यांच्या अर्जावर न्यायालय ७ जून रोजी सुनावणी घेणार आहे.

SCROLL FOR NEXT