अहमदाबाद; वृत्तसंस्था : देशाला हादरवून सोडणाऱ्या अहमदाबाद येथे घडलेल्या एअर इंडियाच्या AI-171 विमान दुर्घटनेला आज एक वर्ष पूर्ण झाले. १२ जून २०२५ रोजी अहमदाबादहून लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे हे बोईंग 787-8 ड्रीमलाईनर विमान निघाले होते. उड्डाणानंतर विमान काही क्षणांतच बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृह संकुलावर कोसळले. या भीषण दुर्घटनेत विमानातील २४२ प्रवाशांपैकी २४१ तर जमिनीवरील १९ जण असे मिळून २६० जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, या अपघाताच्या अंतिम तपास अहवाल मात्र अजूनही समोर आलेला नाही. त्यामुळे अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
अंतिम अहवालाला विलंब
प्राथमिक तपास अहवालात दोन्ही इंजिनांना इंधनपुरवठा करणारे ‘फ्युएल कटऑफ स्विच’ अचानक बंद झाल्याचा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे इंजिनांना इंधनपुरवठा थांबून विमान कोसळल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र अंतिम निष्कर्ष अद्याप जाहीर झालेला नाही. विमानाच्या इंजिनांचे तांत्रिक परीक्षण आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील तपास प्रक्रिया अद्याप सुरू असल्याने अंतिम तपास अहवाल काही महिने लांबू शकतो.
अहमदाबादमध्ये श्रद्धांजली
दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या प्रवाशांच्या कुटुंबीयांनी वर्षपूर्तीच्या निमित्ताने अहमदाबादमध्ये श्रद्धांजली कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. अनेक कुटुंबीयांनी नुकसानभरपाईपेक्षा सत्य समोर येणे अधिक महत्त्वाचे असल्याचे सांगितले आहे. ‘आम्हाला फक्त उत्तर हवी आहेत. ही दुर्घटना नेमकी कशी घडली, हे जाणून घेण्याचा आमचा अधिकार आहे,’ अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.
आनंद येथील पार्थ पटेल म्हणाले, ही केवळ दुर्घटना नव्हती, तर व्यवस्थेचे मोठे अपयश होते. या दुर्घटनेत आई हेमांगिनी, काका रजनीकांत आणि काकू दिव्या यांना गमावले. लंडनमध्ये पदवीदान समारंभासाठी ते निघाले होते. वर्ष झाले, पण अजूनही जबाबदारी निश्चित झालेली नाही.न्यायाची आश्वासने केवळ कागदावरच आहेत.
एकमेव बचावलेले विश्वास कुमार आजही होतात अस्वस्थ
या दुर्घटनेत विमानातील ११-ए क्रमांकाच्या आसनावर बसलेले विश्वास कुमार हे एकमेव प्रवासी बचावले. विमानाचे दोन तुकडे झाल्यानंतर काही क्षणांतच त्यांनी सीटबेल्ट सोडवून तुटलेल्या भागातून बाहेर पडण्यात यश मिळवले. काही सेकंदांचा उशीर झाला असता तर आपणही आगीच्या भक्ष्यस्थानी पडलो असतो, याची जाणीव त्यांना आजही अस्वस्थ करते. मात्र, जीव वाचला म्हणून वेदना संपल्या नाहीत. या अपघातात त्यांनी आपल्या भावालाही गमावले. वर्षभरानंतरही प्रत्येक दिवस त्या दुःखाची आठवण करून देतो. माझ्याच नव्हे, तर या दुर्घटनेत प्रियजनांना गमावलेल्या प्रत्येक कुटुंबाच्या मनात अनेक प्रश्न आहेत. सत्य समोर यावे, नेमके काय घडले हे कळावे, एवढीच अपेक्षा आहे, असे ते सांगतात. ब्रिटनमधील लिसेस्टर येथे पत्नी आणि पाच वर्षांच्या मुलासोबत राहत असलेले विश्वास कुमार आजही त्या सावटातून पूर्णपणे बाहेर पडू शकलेले नाहीत.
महत्त्वाचा घटनाक्रम
१३ जून २०२५ : विमान अपघात अन्वेषण ब्युरो (एएआयबी) कडून चौकशीला सुरुवात.
१६ जून : कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर आणि विमानाचे आपत्कालीन लोकेटर ट्रान्समीटर ताब्यात घेतले.
१२ जुलै : एएआयबीच्या अहवालात दोन्ही इंजिनांचे इंधन नियंत्रण स्विचेस ‘कट ऑफ’ स्थितीत गेल्याने इंधनपुरवठा बंद झाला आणि इंजिनांचा जोर कमी झाल्याचे नमूद केले आहे.
१३ नोव्हेंबर : सर्वोच्च न्यायालयाने वैमानिक कॅप्टन सुमित सभरवाल यांना दुर्घटनेसाठी दोषी धरता येणार नाही, असे नमूद केले.
३ फेब्रुवारी २०२६ : डीजीसीएने तपासणीनंतर विमानातील इंधन नियंत्रण स्विचेस कार्यक्षम असल्याचे स्पष्ट केले.
१ एप्रिल २०२६ : प्राथमिक अहवालातील तांत्रिक माहिती सार्वजनिक करण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली.
विमानाचे नेतृत्व करणारे कॅप्टन सुमित सभरवाल हे जवळपास तीन दशकांचा अनुभव असलेले वैमानिक होते. त्यांच्याकडे ८२०० तासांचा उड्डाण अनुभव होता. त्यांच्यासोबत फर्स्ट ऑफिसर क्लाईव्ह कुंदर हे सहवैमानिक होते. केबिन क्रूमध्ये वरिष्ठ फ्लाईट अटेंडंट अपर्णा महाडिक, श्रध्दा धवन, दीपक पाठक, सायनीता चक्रवर्ती, रोशनी सोंघारे, मैथिली पाटील यांच्यासह इतर सदस्यांचा समावेश होता. डोंबिवलीच्या रोशनी सोंघारे यांनी अत्यंत साध्या परिस्थितीतून एअर होस्टेस होण्याचे स्वप्न पूर्ण केले होते. न्हावा गावातील मैथिली पाटील ही गावातील पहिली हवाई सुंदरी होती. वरिष्ठ फ्लाइट अटेंडंट अपर्णा महाडिक यांचे पतीही एअर इंडियातच कार्यरत असून त्यांना आठ वर्षांची मुलगी आहे. मुलुंडच्या श्रध्दा धवन या २१ वर्षांपासून एअर इंडियामध्ये कार्यरत होत्या, तर बदलापूरचे दीपक पाठक गेली ११ वर्षे विमानसेवेत होते.
मुझफ्फर सय्यद म्हणाले, ईद साजरी करण्यासाठी अहमदाबादला आलेली बहीण नफिसा, मेहुणे सईद इनायत अली आणि दोन लहान मुले लंडनला परत जात असताना अपघात घडला. दहा दिवसांनंतर कुटुंबीयांचे मृतदेह मिळाले. त्या धक्क्यातून कुटुंब सावरू शकलेले नाही. घरातील चार माणसे एका क्षणात गेली. वडील आजही रडतात. पूर्वीसारखे सण-समारंभ साजरे होत नाहीत. घरात फक्त आठवणी उरल्या आहेत, असे सांगताना मुझफ्फर यांचा कंठ दाटून आला. आर्थिक मदत मिळाली असली तरी अपघाताचे कारण समोर आलेले नाही, याची खंत सय्यद कुटुंबीयांना आहे.
विमान कोसळल्यानंतर सर्वप्रथम घटनास्थळी धाव घेणारे संजय बागी हे त्या दिवशीची दृश्ये आजही विसरलेली नाहीत. वैमानिकासह २८ मृतदेह बाहेर त्यांनी बाहेर काढले होते. रात्री डोळे मिटले की ती दृश्ये पुन्हा समोर उभी राहतात. शांत झोप लागणे कठीण झाले आहे. अनेकांच्या आयुष्यात त्या दिवसाची राख अजूनही विझलेली नाही, असे ते म्हणाले.
या अपघातातील मृतांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही समावेश होता. दरम्यान, यअर इंडियाने मृतांच्या कुटुंबीयांसाठी २५ लाख रुपयांच्या अंतरिम मदतीची घोषणा केली होती तर टाटा सन्सकडून प्रत्येक कुटुंबाला १ कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती.