नोएडा; वृत्तसंस्था : निवासी इमारतीत चार्जिंगला लावलेल्या इलेक्ट्रिक वाहनातून उडालेल्या ठिणग्यांमुळे भीषण आग लागून दोघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नोएडातील मामुरा गावात घडली. आगीच्या ज्वाळा वेगाने पसरल्याने जवळ उभी पेट्रोलवर चालणारी इतर वाहनेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांनी ७ अग्निशमन बंब व हायड्रॉलिक प्लॅटफॉर्मसह घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवत इमारतीत राहणाऱ्या ५० कुटुंबांना सुखरूप बाहेर काढले. मात्र, यात एक पुरुष आणि एका महिलेला धुरामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. जिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी फेज-३ पोलिस ठाण्यात इमारतीचे मालक व भाडेपट्टा धारकांविरुद्ध गुन्हा नोंदवून दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या इमारतीत सुमारे ५० कुटुंबे राहत होती. इलेक्ट्रिक वाहनाच्या चार्जिंगदरम्यान उडालेल्या ठिणगीमुळे आग लागली आणि ती जवळच्या पेट्रोल वाहनांमध्ये पसरली, ज्यामुळे ही दुर्घटना घडली.