नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : कर्मचारी निवृत्ती योजनेतील (ईपीएस- ९५) अंतर्गत निवृत्त कर्मचाऱ्यांना किमान ७ हजार ५०० रुपये मासिक निवृत्तीवेतन मिळावे, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी लोकसभेत केली. लोकसभेत शून्य प्रहर दरम्यान त्यांनी हा मुद्दा मांडला.
खासदार नरेश म्हस्के म्हणाले, की देशभरातील केंद्रीय आणि राज्य सरकारच्या कंपन्या, खासगी संस्था, कारखान्यांमधील ७८ लाख निवृत्तांना केवळ १००० रुपये दिले जात आहे. सध्याच्या महागाईच्या काळात हे निवृत्तीवेतन तुटपुंजे असून हे निवृत्तीवेतनधारक मुलभूत गरजा आणि आरोग्य सेवांपासून वंचित आहेत. २०१३ मध्ये कोशियारी समितीने तसेच २०१८ मध्ये श्रम मंत्रालयाच्या संसदीय स्थायी समितीने या निवृत्तांना दरमहा किमान ७५०० रुपये व कमाल १००५० रुपये निवृत्तीवेतन दिले जावे अशी शिफारस केली होती. मात्र, अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही याकडे खासदार म्हस्के यांनी लक्ष वेधले.