पुढारी ऑनलाईन डेस्क : वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकर यांनी केंद्र सरकारने इंडियन अॅडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसमधून (IAS) शनिवारी कार्यमुक्त केले आहे. आयएएस (प्रोबेशनरी) नियम 1954 च्या नियम 12 अन्वये त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.खेडकर यांच्यावर चुकीच्या पद्धतीने OBC आणि दिव्यांग सवलत घेतल्याचा आरोप आहे. सध्या त्या अंतरिम जामिनावर आहेत. पूजा खेडकर यांच्या जामीन अर्जालाही UPSCने विरोध केला होता. खेडकर यांनी फक्त आयोगाचीच फसवणूक केलेली नाही तर जनतेचीही फसवणूक केलेली आहे, असे UPSCने म्हटले होते. जुलै महिन्यात UPSCने त्यांची प्रोबेशनवरील उमेदवारी रद्द केली होती. खेडकर यांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती.
पूजा खेडकर (३४) यांची पुण्यात प्रोबेशनवर नियुक्ती झाली होती. त्यांनी स्वतंत्र केबिन आणि कार मागितल्यानंतर त्या चर्चेत आल्या. तसेच त्यांनी त्यांच्या खासगी ऑडी कारवर लाल दिवाही लावला होता. यातून त्यांच्यावर टीकेची झोड सुरू झाली. सुरुवातीला त्यांची बदली वाशिम जिल्ह्यात करण्यात आली. सुरुवातीला लाल बहाद्दुर शास्त्री नॅशनल अॅकॅडमी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशनने त्यांचे प्रशिक्षण स्थगित केले. खेडकर यांनी सादर केलेले ओबीसी प्रमाणपत्र आणि दिव्यांग प्रमाणपत्र संशयाच्या भोवऱ्यात सापडले. पूजा खेडकर यांनी मात्र हे आरोप नाकारले आहेत.