Yoga guru Swami Sivananda
योगगुरू बाबा शिवानंद यांचे शनिवारी (दि.३ मे) रात्री ८.४५ वाजता वाराणसीत निधन झाले. ते १२८ वर्षांचे होते. श्वसनास त्रास होत असल्यानेगेल्या तीन दिवसांपासून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर शनिवारी त्यांची प्राणज्योत मालवली. बाबा शिवानंद यांना २१ मार्च २०२२ रोजी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. पद्मश्री पुरस्कार मिळवणारे ते देशातील सर्वात ज्येष्ठ व्यक्ती ठरले होते.
बाबा शिवानंद यांच्या जन्म ८ ऑगस्ट १८९६ रोजी पश्चिम बंगालमधील श्रीहट्टी येथील एका भिक्षू ब्राह्मण गोस्वामी कुटुंबात झाला. सध्या हे ठिकाण बांगलादेशात आहे. त्याचे आईवडील भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करत होते. वयाच्या चौथ्या वर्षीशिवानंद बाबांच्या पालकांनी त्यांना नवद्वीप येथील रहिवासी बाबा ओंकारानंद गोस्वामी यांच्याकडे सोपवले. शिवानंद सहा वर्षांचे असताना त्याचे आई-वडील आणि बहिणीचा उपसमारीमुळे मृत्यू झाला होता. गुरू बाबा ओंकारानंद गोस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवानंद अध्यात्म शिकले. त्यांच्या प्रेरणेने त्यांनी आयुष्यभर ब्रह्मचर्य व्रताचे पालन केले. बाबा शिवानंद यांनी आयुष्यभर योगाभ्यास केला. ते कुठेही राहिले तरी निवडणुकीच्या दिवशी वाराणसीला येऊन आपला हक्क बजावण्यास ते कधीही विसरले नाहीत. या वर्षाच्या सुरुवातीला ते प्रयागराज महाकुंभात पोहोचले होते आणि पवित्र संगमात पवित्र स्नान केले होते.
बाबा शिवानंद यांचा दिवस पहाटे तीन वाजता ध्यान आणि योगासनाने होत असे. ते आहारात उकडलेले अन्न घेत असत. त्यांनी आपल्या संपूर्ण जीवनात कधीच भात खाल्ला नाही. देवाच्या कृपेने मला कोणत्याही गोष्टीची ओढ किंवा ताण नाही. इच्छा हीच सर्व समस्यांचे कारण आहे. बाबा शिवानंद यांनी औपचारिक शिक्षण घेतले नव्हते. ते कधीही शाळेत गेले नाहीत. तरीही ते अत्यंत उत्कृष्ट इंग्रजी बोलत असत.
बाबा शिवानंद यांना २१ मार्च २०२२ रोजी दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आला हाेता. बाबा शिवानंद यांचा साधेपणा इतका होता की, ते पुरस्कार स्वीकारण्यासाठी अनवाणी पायांनी राष्ट्रपती भवनात गेले. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झाल्यानंतर त्यांनी गुडघे टेकून पंतप्रधान मोदींबद्दल कृतज्ञता व्यक्त केली होती. यावेळी पंतप्रधान मोदींनीही त्यांच्या खुर्चीवरून खाली उतरून आदराने त्यांच्यासमोर नतमस्तक झाले होते. जेव्हा बाबा शिवानंद राष्ट्रपतींसमोर नतमस्तक झाले तेव्हा तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना नतमस्तक होऊन वर उचलले होते. हा प्रसंग सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. योगगुरु बाबा शिवानंद यांचा नम्रपणा आणि एक योगी जीवन भावी पिठ्यांसाठी आदर्शवत ठरले होते.
योगगुरू बाबा शिवानंद यांचे निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी 'एक्स'वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "योगाभ्यासक आणि काशीचे रहिवासी शिवानंद बाबाजी यांच्या निधनाने अत्यंत दुःख झाले. योग आणि ध्यानासाठी त्यांचे समर्पितजीवन देशातील प्रत्येक पिढीला प्रेरणा देत राहील. योगाद्वारे समाजसेवा केल्याबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. शिवानंद बाबांचे शिवलोकात जाणे हे आपल्या सर्व काशीवासीयांसाठी आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेणाऱ्या लाखो लोकांसाठी एक कधीही भरून न येणारे नुकसान आहे. या दुःखाच्या वेळी मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो." दरम्यान, बाबा शिवानंद हे वाराणसीतील भेलुपूरच्या दुर्गाकुंड भागातील कबीर नगरमध्ये राहत होते. त्यांचा आश्रम इथे आहे. त्यांच्या पार्थिवावर हरिश्चंद्र घाटावर अत्यंसंस्कार केले जाणार आहेत.