Kishtwar Encounter (file photo)
राष्ट्रीय

Kishtwar Encounter | J&K च्या किश्तवाडमध्ये दुसऱ्या दिवशीही चकमक सुरुच, महाराष्ट्रातील एक जवान शहीद

किश्तवाड जिल्ह्यात सुरू असलेल्या ऑपरेशन जोरदार गोळीबार सुरू आहे

दीपक दि. भांदिगरे

Kishtwar Encounter

जम्मू आणि काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील चतरू भागातील सिंगपोरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांत शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही चकमक सुरूच आहे. येथे सुरू असलेल्या चकमकीदरम्यान गुरुवारी कर्तव्य बजावताना एका जवान शहीद झाले. शहीद जवानाचे नाव संदीप पांडुरंग गायकर असे आहे. ते महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा गावाचे भूमिपुत्र आहेत. ते मराठा बटालियनमध्ये होते.

"येथे सुरू असलेल्या ऑपरेशनदरम्यान जोरदार गोळीबार सुरू आहे. यात आमचा एका शूर जवान गोळीबारात गंभीर जखमी झाला. सर्वोत्तम वैद्यकीय उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली," असे व्हाईट नाईट कॉर्प्सने X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

गुप्त माहितीच्या आधारे लष्कराच्या २ पॅरा स्पेशल फोर्सेस, आसाम रायफल्स, ११ राष्ट्रीय रायफल्स, जम्मू-काश्मीर पोलिसांचा स्पेशल ऑपरेशन ग्रुप (SOG) आणि स्थानिक पोलिस यांच्या संयुक्त पथकांनी घेराबंदी करुन शोध मोहीम सुरू केली. या दरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला. त्याला सुरक्षा जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. यात तीन जवान जखमी झाले. यातील एक जवानाची रुग्णालयात उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. तर दोघांना उपचारासाठी उधमपूर येथील लष्करी कमांड रुग्णालयात हलवण्यात आले.

शहीद जवान संदीप गायकर यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार

शहीद जवान संदीप पांडुरंग गायकर यांच्या पार्थिवावर शुक्रवार (दि. २३) लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. संदीप गायकर हे अत्यंत शिस्तप्रिय, कर्तव्यनिष्ठ होते. त्यांच्या बलिदानाने ब्राह्मणवाडा गावासह संपूर्ण अकोले तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. गायकर यांच्यावर शुक्रवारी ब्राह्मणवाडा येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT