नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा-
शेतकऱ्याच्या शेतीमालासाठी हमीभाव कायदा झाला पाहिजे, नाहीतर देशव्यापी आंदोलन करु, असा इशारा २५० पेक्षा जास्त शेतकरी संघटनांच्या बैठकीत केंद्र सरकारला देण्यात आला. दिल्लीमध्ये रकाबगंज गुरूव्दार येथे एम. एस. पी. गॅरंटी किसान मोर्च्याच्या वतीने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत २५ राज्यातून शेतकरी संघटनांचे नेते उपस्थित होते. महाराष्ट्रातील स्वाभिनानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी या बैठकीला उपस्थित होते. बैठकीत हमीभाव, शेतकरी आंदोलन आणि आगामी विधानसभा निवडणुकीवर चर्चा झाली.
बैठकीनंतर बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, शेतकरी संघटनांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पत्र देण्यात आले आहेत. या पत्रांद्वारे केंद्र सरकारला देशात आणि राहुल गांधी यांना काँग्रेसशासित राज्यांमध्ये हमीभाव कायदा करण्याची विनंती करण्यात आली आहे. ते म्हणाले की, केंद्र सरकारने किमान हमीभावाचा कायदा पारित करावा या मागणीसाठी पुन्हा एकदा देशभरातील शेतकरी संघटनांनी एल्गार पुकारला आहे. पुढे बोलताना शेट्टी म्हणाले की, केंद्र सरकारने हमीभावाचा कायदा मंजूर केल्या देशातील शेती अर्थव्यवस्था मजबूत होईल. या बैठकीस समन्वयक सरदार व्ही.एम. सिंग , राजाराम त्रिपाठी , चंद्रशेखर कुडेहाळी ,आमदार यावर मीर , दयानंद पाटील , यांच्यासह देशभरातील विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी या उपस्थित होते.
सरकारने हमीभाव कायद्यावर योग्य पावले उचलली नाही. तर हरियाणातील शेतकरी संघटना विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे या बैठकीत ठरले आहे. या निवडणुकीतून जनमत शेतकरी संघटनेसोबत किती आहे? याची चाचपणी केली जाईल, असे राजू शेट्टी म्हणाले.