Elon Musk father Errol Musk India visit |
अयोध्या : जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असलेल्या एलॉन मस्क यांचे वडील एरोल मस्क आणि बहिण अलेक्झांड्रा मस्क यांनी बुधवारी अयोध्येतील राम मंदिराला भेट दिली. ही भेट त्यांच्या आयुष्यातील "सर्वोत्तम गोष्टींपैकी एक" असल्याचे त्यांनी म्हटले.
एरोल मस्क यांनी हनुमानगढी मंदिरालाही भेट दिली. ते म्हणाले, "मी इथे आलो याचा मला खूप आनंद आहे. मी मंदिर पूर्ण होईपर्यंत थांबू शकत नाही. हे भव्य मंदिर जगातील चमत्कारांपैकी एक ठरेल, हे अद्भुत आहे, माझ्या आयुष्यातील आतापर्यंतच्या सर्वोत्तम गोष्टींपैकी एक आहे." असे त्यांनी म्हटले.
दोन्ही मंदिरांना भेट दिल्यानंतर माध्यमांशी बोलाताना ते म्हणाले, "भारतात माझा अनुभव अद्भुत राहिला आहे. मी सर्वोटेकसोबत काम सुरू करण्यासाठी येथे आलो आहे आणि देशात बराच वेळ घालवण्यास उत्सुक आहे. मंदिरे अद्भुत आहेत आणि लोकही अद्भुत आहेत.''
एरोल त्यांची मुलगी अलेक्झांड्रा मस्कसह बुधवारी दुपारी अडीच वाजता अयोध्या विमानतळावर पोहोचले. दुपारी चार पर्यंत त्यांनी परिसर पाहिला.
विशेष म्हणजे, राम मंदिराच्या भेटीदरम्यान त्यांनी कुर्ता-पायजमा परिधान केला होता. एरोल मस्क १ जून रोजी भारत दौऱ्यावर आले आहेत. ६ जूनपर्यंत ते भारतात असणार असल्याचे सांगण्यात आले आहे.