नवी दिल्ली : राजकारणात प्रत्येक जण विजयासाठी आणि सत्तेसाठी धडपडत असतो. पण तामिळनाडूच्या एका ६५ वर्षीय व्यक्तीने मात्र 'पराभव' हेच आपल्या जीवनाचे ध्येय बनवले आहे. डॉ. के. पद्मराजन असे या अवलियाचे नाव असून, त्यांनी आतापर्यंत २३९ निवडणुका लढवल्या आहेत आणि विशेष म्हणजे या सर्व निवडणुकांत त्यांचा पराभव झाला आहे. त्यांच्या या अजब विक्रमामुळे त्यांची नोंद 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये 'देशातील सर्वात अयशस्वी उमेदवार' म्हणून झाली आहे.
डॉ. पद्मराजन हे व्यवसायाने टायर दुरुस्तीचे दुकान चालवतात आणि होमिओपॅथी उपचारही देतात. स्वतःला अभिमानाने 'इलेक्शन किंग' म्हणवून घेणाऱ्या पद्मराजन यांची प्रचाराची पद्धत ऐकून तुम्ही थक्क व्हाल. ते मतदारांना विनंती करतात की, ‘कृपया मला मतदान करू नका!’ पद्मराजन म्हणतात, ‘मला जिंकायचे नाहीये, तर मला 'सर्वात अयशस्वी उमेदवार' हा माझा किताब कायम राखायचा आहे. जर मी चुकून कधी निवडून आलो, तर मला हार्ट अटॅकच येईल.’
१९८८ मध्ये आपले मूळ गाव मेट्टूरमधून निवडणुकीचा श्रीगणेशा करणाऱ्या पद्मराजन यांनी आजवर कोणालाही सोडलेले नाही. त्यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहन सिंग, पी.व्ही. नरसिंह राव, विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधातही शड्डू ठोकला आहे. इतकेच नाही तर माजी मुख्यमंत्री जयललिता, एम. करुणानिधी यांसारख्या दिग्गज राजकारण्यांसह अभिनेत्री हेमा मालिनी आणि अभिनेते विजयकांत यांसारख्या कलाकारांविरुद्धही त्यांनी निवडणूक लढवली आहे.
निवडणूक लढवणे हा केवळ छंद नसून त्यासाठी त्यांना मोठी आर्थिक किंमतही मोजावी लागली आहे. पद्मराजन यांच्या मते, आतापर्यंत केवळ उमेदवारी अर्जाची अनामत रक्कम (Security Deposit) भरण्यात त्यांनी ८० लाख रुपयांहून अधिक रक्कम गमावली आहे. नियमानुसार, एकूण मतांच्या किमान १६% मते न मिळाल्यास ही रक्कम जप्त होते आणि पद्मराजन यांच्या बाबतीत प्रत्येक वेळी हेच घडले आहे. पण त्याचा त्यांना अजिबात खेद नाही. उलट, सर्वाधिक वेळा निवडणूक लढवणारा उमेदवार म्हणून त्यांचे नाव 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंदवले जावे, ही त्यांची इच्छा आहे.
‘लोक निवडणुकीत अर्ज भरायला घाबरतात, मला त्यांचा हा भीती घालवायची आहे. मला एक आदर्श बनायचे आहे की, सामान्य माणूसही देशाच्या मोठ्या निवडणुका लढवू शकतो,’ असे पद्मराजन ठामपणे सांगतात. २०११ मध्ये मेट्टूर विधानसभा निवडणुकीत त्यांना मिळालेली ६,२७३ मते ही त्यांची आजवरची सर्वोत्तम कामगिरी आहे.
पद्मराजन यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत केरळमधील त्रिशूर आणि तामिळनाडूतील धर्मपुरी या दोन मतदारसंघातून अर्ज भरला होता. निकाल काहीही लागो, पण पद्मराजन यांनी 'पराभवाचा जो उत्सव' मांडला आहे, त्याची चर्चा आजही जगभर होत असते.