राष्ट्रीय

Postal Ballot Counting : मतमोजणीबाबत निवडणूक आयोगाने घेतला मोठा निर्णय, जाणून घ्‍या नवीन नियम

बिहार विधानसभा निवडणुकीपासून नवीन नियम लागू होणार, मतमोजणीत आणणार अधिक पारदर्शकता

पुढारी वृत्तसेवा

postal ballot counting new rules : : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये अधिक पारदर्शकता आणण्यासाठी, निवडणूक आयोगाने (ECI) टपाल मतपत्रिकांच्या मतमोजणी प्रक्रियेत मोठे बदल केले आहेत. आता टपाल मतपत्रिकांची मोजणी पूर्ण झाल्याशिवाय ईव्हीएम (EVM) मतमोजणीचा शेवटचा टप्पा सुरू केला जाणार नाही.

आतापर्यंतची मतमोजणी कशी होत होती?

सामान्यतः, टपाल मतपत्रिकांची मोजणी सकाळी ८ वाजता सुरू होते. त्‍यानंतर ईव्हीएमची मोजणी अर्ध्या तासाने सुरू होते. पूर्वीच्या नियमांनुसार, ईव्हीएमची मोजणी टपाल मतपत्रिकांच्या मोजणीपासून स्वतंत्रपणे केली जात होती. त्यामुळे, टपाल मतपत्रिकांची मोजणी पूर्ण होण्यापूर्वीच ईव्हीएमची मोजणी संपण्याची शक्यता होती. मात्र, मतमोजणी प्रक्रियेत सुसूत्रता आणि पूर्ण पारदर्शकता राखण्यासाठी निवडणूक आयोगाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता ईव्हीएमच्या मतमोजणीचा अंतिम किंवा दुसऱ्या क्रमांकाचा अंतिम टप्पा संबंधित मतमोजणी केंद्रांवर टपाल मतपत्रिकांची मोजणी पूर्ण झाल्यावरच सुरू केला जाईल.

बिहार विधानसभा निवडणुकीत नवा नियम लागू होणार

या नव्या नियमांचा पहिला प्रयोग बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये केला जाईल. नोव्‍हेंबर २०२५ मध्‍ये येथे निवडणुका होणार आहेत. आयोगाने स्पष्ट केले आहे ,की यामुळे मतमोजणी प्रक्रिया अधिक सुसूत्र आणि पारदर्शक होईल. यामुळे मतदार आणि उमेदवारांमध्ये कोणताही संभ्रम राहणार नाही. दरम्‍यान, निवडणूक आयोगाने निर्देश दिले आहेत की, ज्या मतदारसंघांमध्ये टपाल मतपत्रिकांची संख्या जास्त असेल, तिथे पुरेशा प्रमाणात टेबल आणि मतमोजणी कर्मचारी नियुक्त करावेत. याचा उद्देश मतमोजणीतील विलंब टाळणे आणि प्रक्रिया वेळेवर पूर्ण करणे हा आहे.

टपाल मतपत्रिकांच्या संख्येत वाढ

आयोगाने स्‍पष्‍ट केले आहे की, अलीकडेच दिव्यांग मतदार आणि ८५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी घरून मतदान करण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. यामुळे टपाल मतपत्रिकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत, मतमोजणीची प्रक्रिया अधिक सुसूत्र करणे अत्यंत आवश्यक होते. या नव्या उपायांमुळे निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ होईल. टपाल मतपत्रिकांची मोजणी पूर्ण होईपर्यंत ईव्हीएमची शेवटची मोजणी थांबवण्याचा निर्णय सर्व उमेदवार आणि राजकीय पक्षांना हे आश्वासन देतो की मतमोजणीमध्ये कोणतीही घाई किंवा अनियमितता होणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT