पुढारी ऑनलाईन डेस्क: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतमोजणी प्रक्रिया २३ नोव्हेंबरला पार पडली. यानंतर विरोधी पक्षातील बहुतांशी उमेदवारांनी EVM वर शंका उपस्थित केली. त्यानंतर अनेक उमेदवारांनी आयोगाकडे फेरमतमोजणीची मागणी केली होती. या मागणीला केंद्रीय निवडणूक आयोगाने उत्तर दिले आहे. ( Maharashtra elections results)
महाराष्ट्र निवडणूक मतमोजणीत फेरफार झाल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने केला होता. या आरोपांवर चर्चा करण्यासाठी आयोगाने 3 डिसेंबर 2024 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) शिष्टमंडळाला आमंत्रित केले आहे. तसेच सर्व कायदेशीर शंकांचे निरसन करणार असल्याचे आश्वासन देखील निवडणूक आयोगाने दिल्याचे वृत्त ANI ने दिले आहे.
आयोगाने निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ही पारदर्शक झाली आहे. निवडणूकीच्या प्रत्येक टप्प्यावर उमेदवार/त्यांच्या एजंटांच्या सहभागासह पारदर्शक प्रक्रियेचा पुनरुच्चार करण्यात आला आहे. तसेच राजकीय पक्षांच्या सहभागासह पारदर्शक मतदार यादी अद्ययावत प्रक्रिया केल्याचेही आयोगाने म्हटले आहे. तसेच वैयक्तिकरित्या प्रत्येक उमेदवाराचे लेखी ऐकल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या सर्व समस्यांचे कायदेशीररित्या पूर्तता करणार असल्याचे आश्वासन देखील केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहे.