Election Commission of India Notification
नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी गुरुवारी (दि.७) अधिसूचना जारी केली. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणूक कायदा, १९५२ च्या कलम ४ च्या उपकलम (४) आणि (१) अंतर्गत अधिसूचना जारी करण्यात आली.
उपराष्ट्रपती पदासाठी ९ सप्टेंबर रोजी निवडणूक होणार आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होईल. त्यानंतर लगेच निकाल जाहीर केला जाईल. नामांकन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख २१ ऑगस्ट असेल. तर २२ ऑगस्ट रोजी उमेदवारी अर्जांची छाननी केली जाईल. उमेदवारांना नामांकन परत घेण्याची अंतिम मुदत २५ ऑगस्ट असेल, असे अधिसूचनेत म्हटले.
लोकसभा आणि राज्यसभेतील खासदार या निवडणुकीत मतदान करतील. संसद भवनाच्या पहिल्या मजल्यावरील खोली क्रमांक एफ-१०१ मध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदारांना उमेदवारांच्या नावांसमोर १,२,३,४ असा पसंती क्रमांक देऊन मतदान करावे लागते. दरम्यान, जगदीप धनखड यांनी २१ जुलै रोजी आरोग्याचे कारण देत उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे ही निवडणूक होत आहे.