नवी दिल्ली : मतदारयादीच्या विशेष सखोल पडताळणी (एसआयआर) दरम्यान मतदारांचे मसुदा यादीत नाव नसल्यास ‘फॉर्म-६’ भरावा लागेल. निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रक जारी करून याबाबतचा भ्रम दूर केला आहे. हा फॉर्म भरून मतदार आपले नाव पुन्हा नोंदवू शकतील, असे आयोगाने म्हटले आहे.
आधीपासून मतदार असूनही ‘फॉर्म-६’ भरणे ही चुकीची किंवा खोटी घोषणा मानली जाणार नाही. तसेच, त्यांच्यावर यासाठी कोणतीही कायदेशीर कारवाई होणार नाही. निवडणूक आयोगाने मंगळवारी यासंदर्भात सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना निर्देश जारी केले आहेत.
‘एसआयआर’दरम्यान अनेक जुन्या मतदारांसमोर ‘फॉर्म-६’ भरण्यावरून संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली होती. ‘फॉर्म-६’मध्ये अर्जदाराला आपले नाव पहिल्यांदाच मतदारयादीत समाविष्ट केले जात असल्याची घोषणा करावी लागते. अशा स्थितीत ज्यांची नावे आधीपासूनच मतदारयादीत नोंदवलेली होती, त्यांना पुन्हा ‘फॉर्म-६’ भरल्यास त्यांची घोषणा चुकीची ठरवली जाण्याची भीती वाटत होती.
यामुळे त्यांच्यावर लोकप्रतिनिधी कायदा, १९५० च्या कलम ३१ अंतर्गत कारवाई होऊ शकत होती. निवडणूक आयोगाने स्पष्ट केले की, ‘फॉर्म-६’मधील ही घोषणा १ ऑगस्ट २०२२ पासून लागू आहे. जर एखाद्या मतदाराचे नाव ‘एसआयआर’च्या मसुदा यादीत नसेल, तर तो अंतिम मतदारयादीत नाव समाविष्ट करण्यासाठी विहित प्रक्रियेनुसार ‘फॉर्म-६’ जमा करू शकतो. त्याचे नाव आधीच्या कोणत्याही मतदारयादीत नोंदवलेले होते की नाही, याने काही फरक पडणार नाही.