नवी दिल्ली : नियमांचे उल्लंघन केल्याने ३३४ राजकीय पक्षांना केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी दणका दिला. निवडणूक आयोगाने २०१९ पासून सहा वर्षे एकही निवडणूक लढवण्याची अट पूर्ण न केल्याबद्दल या राजकीय पक्षांना नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या यादीतून काढून टाकले. या पक्षांची कार्यालये प्रत्यक्षरित्या कुठेही स्थित नसल्याचे देखील आढळले आहे. यादीतून वगळण्यात आलेले हे ३३४ नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्ष देशभरातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत, असे निवडणूक आयोगाने निवेदनात म्हटले.
निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर एकूण २ हजार ८५४ नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांपैकी २ हजार ५२० राजकीय पक्ष आता यादीत शिल्लक आहेत. तर देशात सध्या भाजप, काँग्रेस, आप, बसपा, माकप, एनपीपी हे ६ राष्ट्रीय आणि ६७ प्रादेशिक पक्ष आहेत. या वर्षी जूनमध्ये, निवडणूक आयोगाने अशा ३४५ पक्षांविरुद्ध कारवाई सुरू केली होती आणि अखेर ३३४ पक्षांना यादीतून काढून टाकले.
२००१ पासून, निवडणूक आयोगाने तीन ते चार वेळा निष्क्रिय राजकीय पक्षांना यादीतून टाकले आहे, असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. काही राजकीय पक्ष आयकर कायदे आणि मनी लाँडरिंग विरोधी कायद्याचे उल्लंघन करताना आढळले असल्याने ही कारवाई करण्यात आली. देशातील राजकीय पक्ष लोकप्रतिनिधी कायदा १९५१ च्या कलम २९अ च्या तरतुदींनुसार निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत आहेत.