El Niño Impact | ‘अल निनो’चा खरिपाला फटका; तरी पाच वर्षांत अधिक उत्पादन  
राष्ट्रीय

El Niño Impact | ‘अल निनो’चा खरिपाला फटका; तरी पाच वर्षांत अधिक उत्पादन

तांदूळ, डाळी, तेलबिया उत्पादनात मात्र घट

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : ‘अल निनो’च्या प्रभावामुळे झालेल्या अपुऱ्या पावसाचा थेट परिणाम देशातील २०२६-२७ च्या खरीप हंगामावर झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तांदूळ, डाळी, मका आणि तेल बियांच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. असे असले, तरी गेल्या पाच वर्षांच्या सरासरीपेक्षा यंदाचे एकूण उत्पादन अधिक असल्याचा दावा केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याणमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केला आहे.

हवामानातील प्रतिकूल परिस्थिती आणि मान्सूनमधील विलंब असूनही २०२६-२७ मधील खरीप अन्‍नधान्य उत्पादन १६७.१४३ दशलक्ष टन राहण्याचा अंदाज आहे. हे उत्पादन गेल्या पाच वर्षांच्या सरासरीपेक्षा ९.७६७ दशलक्ष टनांनी अधिक आहे, असे कृषिमंत्री चौहान यांनी स्पष्ट केले. कापणीच्या वेळी होणाऱ्या पीक कापणी प्रयोगांची प्रत्यक्ष आकडेवारी आल्यानंतर अंतिम सुधारित अंदाज जाहीर केले जातील.

प्रमुख पिकांच्या उत्पादनात मोठी घसरण

कृषी मंत्रालयाच्या प्राथमिक अंदाजानुसार, गेल्यावर्षीच्या खरीप हंगामाच्या तुलनेत यंदा पिकांच्या उत्पादनात खालीलप्रमाणे घट नोंदवण्यात आली आहे :

तांदूळ : उत्पादनात २.२८ टक्क्यांची घट होऊन ते १२१.९ दशलक्ष टनांवर (गेल्यावर्षी १२४.७५ दशलक्ष टन) राहण्याचा अंदाज आहे.

डाळी आणि तेलबिया : डाळींचे उत्पादन ६.१८ टक्क्यांनी घटून ७.१३ दशलक्ष टन, तर तेलबियांचे उत्पादन १०.२० टक्क्यांनी कमी होऊन २३.९४ दशलक्ष टन राहील. यामध्ये सोयाबीनचे उत्पादन २.३५ दशलक्ष टनांनी घटून १०.२४ दशलक्ष टनांवर आले आहे.

मका : इथेनॉल आणि कुक्कुटपालन उद्योगासाठी महत्त्वाच्या असलेल्या मक्याच्या उत्पादनात १४.५ टक्क्यांची मोठी घसरण होऊन ते २६.०६ दशलक्ष टन राहण्याची शक्यता आहे.

महागाई आणि सरकारी उपाययोजना

साखर धोरणातील गैरव्यवस्थापनामुळे साखरेच्या किमतींनी १६ वर्षांचा उच्चांक गाठला असून भारताला १० लाख टन साखर आयात करावी लागली आहे. खरीप उत्पादनातील घट आणि रब्बी पेरण्यांना झालेला विलंब, यामुळे आगामी काळात अन्‍नधान्य महागाई वाढण्याची भीती आहे. महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकार तांदूळ आणि गव्हावर निर्यात शुल्क लावण्याच्या विचारात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT