नवी दिल्ली : एकनाथ शिंदे म्हणजे राज्याच्या नागरी प्रश्नांची चांगली जाण असलेले नेते आहेत. महाराष्ट्र राज्य पुढे जाण्याची काळजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना घेतली. ते निरंतर राज्याची सेवा करत आहेत, असे गौरवोद्गार ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काढले. तर एकनाथ शिंदे यांचे जीवन लोकसेवेसाठी समर्पित आहे, असे ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 'महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार' प्रदान करण्यात आला, यावेळी मान्यवर बोलत होते. एकनाथ शिंदे यांनी यावेळी 'सरहद' संस्थेसह सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले आणि पुरस्कारातून मिळालेली रक्कम सरहदला शैक्षणिक, सामाजिक कार्यासाठी दान दिली.
मंगळवारी (११ फेब्रुवारी) दिल्लीत माजी केंद्रीय मंत्री आणि दिल्लीत होत असलेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांच्या पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, पद्मभूषण राम सुतार, वैभव डांगे, शैलेश पगारिया, लेशपाल जवळगे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आणि राज्यातील खासदार देखील आवर्जून उपस्थित होते. सरहद, पुणे आयोजित अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आयोजित याच कार्यक्रमात दिल्लीत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सन्माननीय व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या पूर्वी मराठी अभंगांसाठी प्रसिद्ध सरहदच्या शमिमा अख्तर यांच्या अभंग गायनाचा तसेच मराठी गीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमात बोलताना शरद पवार म्हणाले की, राजधानी दिल्लीत साहित्य संमेलन होत आहे. हे साहित्य संमेलन निश्चितच ऐतिहासिक होईल. दिल्लीकरांनी या संमेलनाच्या पाठीशी जी ताकद उभी केली आहे त्याची नोंद इतिहास घेईल, असेही शरद पवार म्हणाले.
शरद पवार म्हणाले की, मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री हे सातारकर होते. पुढे यशवंतराव चव्हाण संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. नंतरच्या काळात पृथ्वीराज चव्हाण आणि त्यानंतर एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले. मलाही राज्याचे नेतृत्व करण्याची संधी लाभली. माझाही साताऱ्याची जवळचा संबंध आहे, असेही शरद पवारांनी विशेषत्वाने नमूद केले.
एकनाथ शिंदे म्हणाले की, महादजी शिंदे यांच्या नेतृत्वाबद्दल आणि आदर्श शासनाबद्दलही आपण बोलतो, ऐकतो. महादजी शिंदे यांनी तलवार चालवली तशी लेखणीही चालवली. महादजी शिंदे यांच्या बाबतचा धडा महाराष्ट्रात शालेय शिक्षणात असावा अशा सूचना राज्यात दिल्या जातील, असेही ते म्हणाले.
एकनाथ शिंदे म्हणाले की, पूर्वीच्या काळी एखाद्या सैनिकाने चांगली कामगिरी केल्यास त्याला मानाचे सोन्याचे कडे दिले जात होते, हा पुरस्कार माझ्यासाठी तसाच असून मराठी मातीने केलेले हे कौतुक आहे. हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नव्हे तर माझ्यासोबत काम करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांचा, लाडक्या भावांचा आणि बहिणींचा आहे. आज बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे असते तर त्यांना निश्चित आनंद झाला असता आणि त्यांनी माझी पाठ थोपटली असती, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी आपल्या गुरुवर्यांची आठवणही काढली. मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भक्कम पाठिंब्याने सरकारने अडीच वर्ष काम केले. यामध्ये शरद पवारांचेही मार्गदर्शन लाभल्याचे शिंदे म्हणाले. आजवर माझ्यावर अनेक आरोप झाले, मात्र मी आरोपांना कामातून उत्तर दिले असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना उत्तर दिले.
यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले की शरद पवार माझ्या वडिलांचे स्नेही आहेत. मराठी माणसांसाठी ते प्रेरणास्त्रोत आहेत आणि त्यांच्यासह महाराष्ट्राची माझी भावनिक नाते आहे. ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले की, मराठा सैन्याने कायम देशासाठी बलिदान दिले. महादजी शिंदे हे रणभूमीवर युद्ध करत होते. मात्र ते उत्तम लेखक आणि कवी देखील होते. दरम्यान, आपल्या ऐतिहासिक आणि जाज्वल्य इतिहासासाठी, संस्कृतीसाठी सरहद आणि विविध संस्था जे काम करतील, त्यासाठी मी सोबत असेल. महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार ज्यांना मिळाला त्या एकनाथ शिंदे यांचे जीवन लोकांची प्रगती आणि कल्याण करण्यासाठी समर्पित आहे. त्याचप्रमाणे शरद पवारांची राजकीय कारकीर्द फार मोठी आहे. पवार राजकारणात असले तरी त्यांनी संस्कृती, कला, क्रीडा, उद्योग अशा सर्व क्षेत्रांमध्ये उत्तम काम केले आहे, असेही ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले.
महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्काराचे स्वरूप ५ लक्ष रुपये, मानपत्र, सन्मानचिन्ह आणि शिंदेशाही पगडी असे आहे. पुरस्कार प्रदान झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पुरस्कारातून मिळालेली ५ लाख रुपये रक्कम आणि स्वतःकडचे आणखी ५ लाख असे एकूण दहा लाख रक्कम सरहद संस्थेला त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक कार्यासाठी जाहीर केली.