नवी दिली : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी (दि.१०) दिल्लीत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी राजनाथ सिंह यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतल्याच्या चर्चा होत्या. मात्र अमित शाह बुधवारी (दि.९) गुजरातमध्ये तर गुरुवारी (दि.१०) झारखंडमध्ये होते, त्यामुळे दिल्लीत त्यांच्यासोबत भेट होणे शक्य नव्हते.
दरम्यान, एकनाथ शिंदे दिल्लीत किंवा इतर ठिकाणी एनडीएच्या कोणत्या वरिष्ठ नेत्यांना भेटले, याबद्दल अनेक शक्यताही वर्तवल्या जात होत्या. मात्र एकनाथ शिंदे यांनी दिल्लीवारी केली आणि यामध्ये राजनाथ सिंह यांची भेट घेतली. गुरुवारी त्यांचा वाढदिवस होता. यानिमित्त त्यांनी शुभेच्छाही दिल्या. याबाबतची माहिती एकनाथ शिंदे यांनी स्वतः त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केली.
एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबातील सदस्यांना आयकर विभागाची नोटीस आल्याच्या चर्चा होत्या. याबद्दल शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी भाष्यही केले होते. नंतर त्यांनी त्यावर स्पष्टीकरणही दिले. दरम्यान, राज्यात विविध राजकीय घडामोडी घडत असताना एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा महत्त्वाचा मानला जातो. यापूर्वी एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर असताना अमित शाह यांची भेट घ्यायचे मात्र यावेळी त्यांनी राजनाथ सिंह यांची भेट घेतली. त्यामुळे निमित्त वाढदिवसाचे असले तरी आता महाराष्ट्राच्या संबंधित बाबींमध्ये अमित शाह यांच्यासह राजनाथ सिंह हे देखील लक्ष घालत आहेत का, अशा चर्चांना जोर आला आहे.