नवी दिल्ली : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांची गुरूवारी (दि.31) बैठक घेतली. राज्यातील विविध कामांच्या संदर्भात काही केंद्रीय मंत्र्यांशी संवादही साधला आणि इतर राज्यांमधून आलेल्या लोकांशी आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. बुधवारी रात्री एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल झाले, गुरुवारी दिवसभराचे कार्यक्रम आटोपून रात्री ते मुंबईला रवाना झाले.
संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना बुधवारी (दि.३१) रात्री एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल झाले. बुधवारीच शिवसेना शिंदे गटाच्या काही खासदारांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर गुरूवारी एकनाथ शिंदेंनी पक्षाच्या सर्व खासदारांची बैठक घेतली. यामध्ये खासदारांची कामगिरी, त्यांचे प्रश्न अशा विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी एकनाथ शिंदेंनी खासदारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात काही केंद्रीय मंत्र्यांशी संवाद साधल्याचे समजते. एनडीएचा घटक पक्ष म्हणून खासदारांनी चांगले काम करावे असा सल्लाही एकनाथ शिंदे यांनी सर्व खासदारांना दिला. त्यानंतर विविध राज्यांमधून आलेल्या लोकांशी एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला. महाराष्ट्राबाहेर इतर राज्यांमध्ये पक्षवाढीच्या दृष्टीने या भेटीगाठी महत्त्वाच्या मानल्या जातात.
शिवसेना शिंदे गटाची लवकरच राजधानी दिल्लीत राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक होणार आहे. या बैठकीला वेगवेगळ्या राज्यांचे राज्य प्रमुख उपस्थित राहणार आहेत. सोबतच वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्राव्यतिरिक्त इतर राज्यांमध्ये संघटना वाढवणे, पक्षाला कार्यक्रम देणे अशा गोष्टी या माध्यमातून होणार असल्याचे समजते.
बैठकांनंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या निकालावर बोलताना ते म्हणाले की, मालेगाव प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत करतो. १७ वर्ष या प्रकरणात आरोपी म्हणून ठेवण्यात आलेल्या अनेक लोकांना यातना भोगाव्या लागल्या. आज न्यायालयाने त्यांना निर्दोष ठरवले आहे. हे स्फोट झाले तेव्हा काँग्रेस आणि आघाडीचे सरकार होते, भगवा दहशतवाद हा शब्दप्रयोग त्यावेळी करण्यात आला. लोकांचे लक्ष विचलित करून चुकीची माहिती देण्यात आली. हे बॉम्बस्फोट म्हणजे एक कारस्थान होते मात्र शेवटी सत्याचा विजय झाला. हा भगव्याचा विजय आहे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार पुढे नेण्यासाठी आम्ही काम करत आहोत, असेही ते म्हणाले.
तत्कालीन सरकारचा दहशतवाद्यांवर वचक नव्हता. कारण तेव्हा सत्तेतील लोकांना मतांचे राजकारण करायचे होते, अशी टीकाही एकनाथ शिंदेंनी काँग्रेसवर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दहशतवादावर प्रहार केला. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जगाने भारताची ताकद बघितली. त्यासंदर्भात विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनाही पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी संसदेत सडेतोड उत्तर दिले. मात्र काही लोकांना पाकिस्तानमध्ये त्यांची वाहवा होत आहे, याचा आनंद होत आहे. असे म्हणत त्यांनी विरोधकांवर टीका केली.
दिल्ली दौऱ्याबाबत बोलताना शिंदे म्हणाले की, दरवेळी अधिवेशन काळात मी दिल्लीला येत असतो. एनडीएचा घटक पक्ष म्हणून आमचे नाते सर्वांशी मजबूत आहे. राज्याच्या विकासाला गती मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे जिथे आवश्यकता असेल तिथे मी येतो, असेही ते म्हणाले.
मुंबई महापालिकेबद्दल बोलताना ते म्हणाले की, ज्यांनी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी असा मुंबई महापालिकेचा उल्लेख केला त्यांनी शेवटी ती कोंबडी समजून कापली. म्हणून त्यांनाही लोक आगामी काळात जागा दाखवतील, अशी खोटक टीका ठाकरे गटावर नाव न घेता केली.
काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री आणि भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह अनेक भेटीगाठी केल्या होत्या. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर होते. त्यामुळे त्यांच्या दिल्ली दौऱ्याची राजकीय वर्तूळात चर्चा सुरू होती. एकनाथ शिंदे एनडीएतील वरिष्ठांच्या भेटी घेण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र एकनाथ शिंदे पुर्ण वेळ श्रीकांत शिंदे याच्या निवासस्थानी होते.