Pakistani Spies  
राष्ट्रीय

Pakistani Spies | व्लॉगर, विद्यार्थी, व्यावसायिक, सिक्योरिटी गार्ड, पाकसाठी हेरगिरी करणाऱ्या ८ जणांना अटक

तीन राज्यांत कारवाई, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हेरगिरी कारवायांवर नजर

दीपक दि. भांदिगरे

Pakistani Spies

भारतीय तपास यंत्रणांनी पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली ३ राज्यांतील किमान ८ जणांना अटक केली आहे. यात हरियाणातील ४ जण, पंजाबमधील ३ आणि उत्तर प्रदेशमधील एकाचा समावेश आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हेरगिरी कारवायांवर नजर ठेवली जात आहे. यादरम्यान ही कारवाई करण्यात आली.

पाकिस्‍तानसाठी हेरगिरी केल्‍याच्या आरोपाखाली ट्रॅव्हल व्लॉगर आणि युट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला अटक करण्यात आली. या कारवाईनंतर हिसार पोलिसांनी तरुण इन्फ्लुएंसर्सना शत्रू देशांकडून टार्गेट केले जात असल्याची बाब निदर्शनास आणून दिली होती. सहज मिळणाऱ्या पैशांच्या लोभापायी असे इन्फ्लुएंसर्स चुकीचा मार्ग स्वीकारतात, असे हिसारचे पोलीस अधीक्षक शशांक कुमार सावन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते.

Jyoti Malhotra | व्लॉगर ज्योती मल्होत्रा

'Travel with JO' नावाचे युट्यूब चॅनल चालवणारी ट्रॅव्हल व्लॉगर ज्योती मल्होत्रा ​​ही हरियाणातील हिसार येथील रहिवाशी आहे. पाकिस्तानला भारतीय लष्कराची माहिती शेअर केल्याच्या आरोपाखाली तिला गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली होती. ३३ वर्षीय ज्योती मल्होत्रा पाकिस्तान उच्चायुक्तालयातील एका अधिकाऱ्याच्या संपर्कात होती. ती किमान दोनवेळा पाकिस्तानला गेली होती, असे पोलीस तपासात आढळून आले आहे.

Davendra Singh Dhillon | दवेंदर सिंग

२५ वर्षीय दवेंदर सिंग ढिल्लन हा पटियाला येथील खालसा कॉलेजचा विद्यार्थी आहे. त्याला १२ मे रोजी हरियाणाच्या कैथालमध्ये फेसबुकवर पिस्तूल आणि बंदुकांचे फोटो अपलोड केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. तो गेल्या नोव्हेंबरमध्ये पाकिस्तानात गेला होता आणि त्याने पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय (ISI च्या अधिकाऱ्यांना देशातील संवेदनशील माहिती दिली होती. त्यात पटियाला मिलिटरी छावणीचा फोटोदेखील समावेश होता.

Nauman Ilahi | नौमन इलाही

हरियाणात सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या २४ वर्षीय नौमन इलाही याला काही दिवसांपूर्वी पानिपत येथून जेरबंद केले होते. रिपोर्टनुसार, तो पाकिस्तानमधील एका आयएसआय हस्तकाच्या संपर्कात होता. पोलिसांच्या माहितीनुसार, पाकिस्तानला माहिती पुरवण्यासाठी उत्तर प्रदेशातील रहिवाशाला त्याच्या मेहुण्याच्या बँक खात्यामार्फत पाकिस्तानातून पैसे येत होते.

Arman | अरमान

गुप्तचर माहितीच्या आधारे, १६ मे रोजी हरियाणाच्या नूह येथे केलेल्या कारवाईत २३ वर्षीय अरमान याला अटक करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार, दोन्ही देशांमधील वाढत्या तणावादरम्यान तो पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवत होता. पोलिसांचे असेही म्हणणे आहे की तो पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचे ठोस पुरावे मिळाले आहेत. त्याची अधिक चौकशी सुरू आहे.

Mohammad Murtaza Ali | मोहम्मद मुर्तजा अली

गुजरात पोलिसांनी जालंधरमध्ये टाकलेल्या छाप्यादरम्यान मोहम्मद मुर्तजा अली याला अटक केली. पाकिस्तानच्या आयएसआयसाठी हेरगिरी केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्याचबरोबर, गझाला आणि यामीन मोहम्मद यांना पंजाबमधून अटक करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT