PM Modi Eid-ul-Adha Message: देशभरात आज ईद-उल-अजहा अर्थात बकरीद मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. मुस्लिम बांधवांसाठी महत्त्वाचा मानला जाणारा हा सण श्रद्धा, त्याग आणि समर्पणाचे प्रतीक मानला जातो. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना, विशेषतः मुस्लिम समाजाला ईद-उल-अजहाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. समाजात बंधुभाव, आनंद आणि ऐक्य अधिक मजबूत व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत ईद-उल-अजहानिमित्त शुभेच्छा दिल्या. त्यांनी आपल्या संदेशात म्हटले की, “ईद-उल-अजहाच्या शुभेच्छा. हा सण आपल्या समाजात बंधुभाव आणि आनंदाची भावना अधिक दृढ करो, अशी प्रार्थना आहे. सर्वांच्या यशासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा.”
पंतप्रधानांच्या या संदेशाला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून अनेकांनीही ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. देशातील विविध भागांमध्ये मुस्लिम समाजाकडून मशिदींमध्ये नमाज अदा करण्यात आली. तसेच एकमेकांना भेटून शुभेच्छा देण्याची परंपराही पार पडत आहे.
दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही ईद-उल-अजहानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या. बकरीद हा सण समर्पण, त्याग आणि बलिदानाचे प्रतीक असल्याचे सांगत त्यांनी या सणाच्या शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रपती भवनाच्या अधिकृत एक्स हँडलवरून करण्यात आलेल्या पोस्टमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, “ईद-उज-अजहाच्या निमित्ताने मी सर्व देशवासियांना, विशेषतः मुस्लिम बंधू-भगिनींना हार्दिक शुभेच्छा देते. हा सण समर्पण, त्याग आणि बलिदानाचे प्रतीक आहे. हा सण आपल्याला मानवतेची सेवा करण्याची प्रेरणा देतो.”
ईद-उल-अजहा किंवा बकरीद हा इस्लाम धर्मातील अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो. या दिवशी त्याग, श्रद्धा आणि सामाजिक एकतेचा संदेश दिला जातो. देशभरात या सणानिमित्त विशेष प्रार्थना, सामूहिक भेटीगाठी आणि सामाजिक सलोखा वाढवणारे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.