नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा-
कर्नाटकातील कथित मुडा गैरव्यवहार प्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता सिद्धरामय्या यांच्याविरोधात अंमलबजावणी संचलनालय (ईडी) गुन्हा दाखल करणार आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना चौकशीसाठी बोलावले जाईल. त्यामुळे त्यांना अटक केली जाण्याची शक्यता आहे.
ईडीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आमच्याकडे या प्रकरणातील एफआयआर आणि इतर तपशील आहे. हा गुन्हा पीएमएलए कायद्याअंतर्गत येतो. आवश्यत औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर सिद्धरामय्या यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणी मुख्यमंत्री सिद्धाराम्मया त्यांच्या पत्नी बी. एम. पार्वती, त्यांचे मेहुणे मल्लिकार्जुन स्वामी आणि देवराजू (ज्यांच्याकडून स्वामी यांनी जमीन विकत घेतली) यांच्यासह इतरांवर २७ सप्टेंबर रोजी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान सिद्धरामय्या यांच्यावर १४ भूखंड वाटपात अनियमितता केल्याचा आरोप आहे. या जमिनीच्या व्यवहारातून सिद्धरामय्या आणि त्यांची पत्नी पार्वती यांनी नफा मिळवल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. तथापि, सिद्धरामय्या यांनी हे आरोप फेटाळून लावले आणि भाजपवर पलटवार केला आहे. कर्नाटक सरकारला "अस्थिर" करण्याचा भाजपचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणी न्यायालयाने आपल्याविरुद्ध चौकशीचे आदेश दिल्यानंतरही आपण राजीनामा देणार नसल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला आहे. हा खटला आपण कायदेशीर लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.