पुढारी ऑनलाईन डेस्क : Mahesh Babu ED summon | दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू याला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) समन्स बजावले आहे. २७ एप्रिल रोजी हैदराबाद येथील ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. साई सूर्या डेव्हलपर्स आणि सुराणा ग्रुप या रिअल इस्टेट कंपन्यांशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात हे समन्स पाठवण्यात आले आहे. महेश बाबू हे या कंपन्यांच्या ग्रीन मेडोज प्रकल्पाचे ब्रँड अॅम्बेसेडर आहेत.
रिअल इस्टेट गुंतवणूकदारांसोबत झालेल्या कथित फसवणुकीशी संबंधित मनी लाँड्रिंग चौकशीचा भाग म्हणून अंमलबजावणी संचालनालयाने बुधवारी अनेक ठिकाणी छापे टाकले होते. सुराणा ग्रुप आणि साई सूर्या डेव्हलपर्सवर ही कारवाई करण्यात आली. सिकंदराबाद, जुबली हिल्स आणि बोवेनपल्ली येथील ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. साई सूर्या डेव्हलपर्स आणि सुराणा ग्रुपने सुरू केलेल्या रिअल इस्टेट प्रकल्पांच्या प्रमोशनल जाहिरातींमध्ये महेशबाबूने काम केले होते. या जाहिरातींसाठी त्याला ५.९ कोटी रुपये मिळाल्याचे वृत्त आहे. ३.४ कोटी रुपये चेकद्वारे आणि २.५ कोटी रुपये रोख स्वरूपात मिळाले होते. मात्र, त्याच्यावर अद्याप कोणतेही आरोप नाहीत.