नवी दिल्ली : आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या दुसऱ्या तिमाहीत देशाचा जीडीपी ५.४ टक्के इतका होता. हा विकासदर अपेक्षेपेक्षा कमी असला तरी येत्या तिमाहीत त्यात सुधारणा होईल, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन मंगळवारी लोकसभेत म्हणाल्या.
लोकसभेत अनुदानाच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना त्या म्हणाल्या की, भारताची "स्थिर आणि शाश्वत" वाढ होत आहे. गेल्या तीन वर्षांत जीडीपी वाढीचा दर सरासरी ८.३ टक्के राहिला आहे. दुसऱ्या तिमाहीत विकासदर कमी झाल्याचे त्यांनी मान्य केले. पण हा तात्पुरता धक्का आहे. त्यात लवकरच सुधारणा होईल.
निर्मला सीतारामन म्हणाल्या की, भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था आहे. याचे श्रेय भारतातील नागरिकांना जाते. उत्पादन क्षेत्रातील मंदीची चिंता त्यांनी फेटाळून लावली. त्यांनी सांगितले की, उत्पादन क्षेत्रात कोणतीही व्यापक घट झाली नाही. काही क्षेत्रांमध्ये आव्हाने असू शकतात. पण एकूण उत्पादन क्षेत्राचा निम्मा भाग मजबूत आहे. मागील वर्षांच्या तुलनेत महागाई नियंत्रणात असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.
संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारच्या काळात महागाईबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, तेव्हा महागाई दोन वाढली होती. तर सध्या एप्रिल-ऑक्टोबर २०२४-२५ मध्ये किरकोळ महागाई ४.८ टक्के होती. ही महागाई कोविड महामारीनंतरची सर्वात कमी आहे. तेलाच्या वाढत्या किमती आणि पुरवठा साखळीतील अडचणी यासह जागतिक आव्हाने असूनही किमती नियंत्रणात असल्याचे यावरून दिसून येते, असे त्या म्हणाल्या. रोजगाराच्या पातळीत झालेल्या सुधारणांबद्दलही अर्थमंत्र्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, देशातील बेरोजगारीचे प्रमाण कमी झाले आहे. २०१७-१८ मध्ये बेरोजगारीचा दर ६ टक्के होता, आता केवळ ३.२ टक्के बेरोजगारी आहे. विविध क्षेत्रांमध्ये अधिक नोकऱ्या निर्माण होत असल्याने बेरोजगारी कमी झाली असल्याचे त्यांनी सांगितले.