पुढारी ऑनलाईन डेस्क : पूर्व लडाख प्रत्यक्ष ताबा रेषेवरील डेपसांग आणि डेमचोकमधून भारत आणि चीन सैन्य माघारीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, असे वृत्त 'पीटीआय'ने दिले आहे. उद्या (गुरुवार, ३१ ऑक्टोबर) दिवाळीच्या दिवशी म्हणजे रोजी उभय देशांच्या सैनिकांमध्ये मिठाईचे वाटप करण्यात येणार आहे.
संरक्षण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही देश एप्रिल २०२० पासून या भागात गस्त घालत होते. पूर्व लडाख सीमेवरील डेपसांग आणि डेमचोकवरुन लष्कर मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. भारत आणि चीनच्या सैन्याने दोन्ही ठिकाणांहून पूर्णपणे माघार घेतली आहे. दिवाळीच्या दिवशी गुरुवारी सैनिकांमध्ये मिठाईचे वाटप करण्यात येणार आहे. या काळात स्थानिक कमांडर स्तरावर चर्चा सुरू राहणार आहे. यापूर्वी एका निवेदनात संरक्षण मंत्रालयाने म्हटले होते की, भारत आणि चीन 28-29 ऑक्टोबरपर्यंत LAC वरून सैन्य माघारीची प्रक्रिया पूर्ण करतील.
भारत आणि चीन यांच्यातील महत्त्वपूर्ण करारानंतर, दोन्ही देशांनी पूर्व लडाखमधील डेमचोक आणि डेपसांगमधील संघर्षाच्या ठिकाणांवरून सैन्य मागे घेण्यास सुरुवात केली. दोन्ही देशाच्या सैन्यांनी माघार घेण्यास सुरुवात केल्याची माहिती सर्व प्रथम १८ ऑक्टोबर रोजी समोर आली. एप्रिल 2020 पासून दोन्ही सेना त्यांच्या पूर्वीच्या स्थितीत परततील, असे सांगण्यात आले. शुक्रवार, २५ ऑक्टोबरपासून भारत आणि चीनच्या सैन्याने पूर्व लडाख सीमेवरून माघार घ्यायला सुरुवात केली होती. दोन्ही सैन्याने डेमचोक आणि डेपसांग पॉइंटवरील तात्पुरते तंबू आणि शेड हटवले. चिलखती वाहने आणि लष्करी उपकरणेही परत घेण्यात आली. पहिल्या दिवशी हा भाग ४० ते ५० टक्के रिकामे करण्यात आले. यानंतर मंगळवारपर्यंत ९० टक्के रिकामे करण्यात आले होते. अखेर बुधवार ३० ऑक्टोबरला भारत आणि चीन सैन्याने माघारीची प्रक्रिया पूर्ण केली.
एप्रिल 2020 मध्ये, लष्करी सरावानंतर चीनने पूर्व लडाखच्या 6 भागात अतिक्रमण केले होते. २०२२ पर्यंत चिनी सैन्याने 4 भागातून माघार घेतली आहे. भारतीय सैन्याला दौलत बेग ओल्डी आणि डेमचोकमध्ये गस्त घालण्याची परवानगी नव्हती. एप्रिल 2020 पूर्वी लष्करी सरावाच्या नावाखाली हजारो चिनी सैनिक सीमेवर जमले. भारतीय लष्करानेही प्रत्युत्तरादाखल कारवाई केली. जून 2020 मध्ये गलवानमध्ये चीनी सैनिक आणि भारतीय सैनिकांमध्ये रक्तरंजित चकमक झाली होती. या काळात 20 भारतीय जवान शहीद झाले. तर याहून दुप्पट चिनी सैनिकही ठार झाले होते. मात्र चीनने तीन सैनिक ठार झाल्याचा दावा केला होता.
रशियाच्या कझान शहरात 23 ऑक्टोबर रोजी सोळाव्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या निमित्त पंतप्रधान मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग त्यांच्यात द्विपक्षीय बैठक झाली. पूर्व लडाखमधील एलएसी बाजूने गस्त घालणे आणि सैन्य काढून टाकण्याच्या कराराचे समर्थन केले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा शांततेच्या आवाहनाचा पुनरुच्चार केला. प्रत्यक्ष ताबा रेषेवरील (एलएसी) वरील शांतता आणि स्थिरता ही आमची प्राथमिकता आहे. यासाठी आमच्यासाठी परस्पर विश्वास आणि आदर आवश्यक आहे. मला विश्वास आहे की आम्ही भविष्यातही खुल्या मनाने चर्चा करू. आमची चर्चा रचनात्मक असेल, असेही यावेळी पंतप्रधान मोदींनी नमूद केले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी 23 ऑक्टोबर रोजी रशियातील कझान येथे ब्रिक्स शिखर परिषदेच्या वेळी त्यांच्या द्विपक्षीय बैठकीदरम्यान पूर्व लडाखमधील एलएसी बाजूने गस्त घालणे आणि सैन्य काढून टाकण्याच्या कराराचे समर्थन केले होते. जून 2020 मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या भीषण चकमकीनंतर दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता. गेल्या काही दशकांतील दोन्ही बाजूंमधील हा सर्वात प्राणघातक लष्करी संघर्ष होता.