पुढारी ऑनलाईन डेस्क : नेपाळ, भारत आणि चीन या तीन देशांमध्ये मंगळवारी सकाळी एकाच वेळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. त्याचे केंद्र नेपाळ सीमेजवळ तिबेट होते, जेथे भूकंपाची तीव्रता ७.१ इतकी मोजली गेली. भारतातील अनेक राज्यांमध्येही या भूकंपाचे धक्के बसले. उत्तर प्रदेश, बिहारपासून दिल्लीही भूकंपाने हादरली आहे.
युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (यूएसजीएस) नुसार, सिक्कीम, नेपाळ आणि भारताच्या सीमेजवळ तिबेट भागात भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळच्या लोबुचेपासून ९१ किमी अंतरावर होता. भूटान आणि बांगलादेशच्या काही भागातही भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, नेपाळ-तिबेट सीमेजवळ असलेल्या झिझांग येथे सकाळी ६:३५ वाजता पहिला ७.१ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. या शक्तिशाली भूकंपासह अनेक भूकंपाचे धक्के बसले. झिझांग परिसरात ४.७ आणि ४.९ तीव्रतेचे दोन धक्के जाणवले. तिबेटमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर असलेल्या शिगात्से शहरात ६.८ तीव्रतेचा भूकंप झाला.
भारतातही दिल्ली-एनसीआर आणि उत्तर भारताच्या विविध भागात भूकंपाचे धक्के जाणवले. पाटणासह बिहारच्या अनेक भागात आणि उत्तरेकडील अनेक ठिकाणी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. आसामसह पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील राज्यांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. सोशल मीडियावर लोकांनी त्यांच्या घरातील व्हिडिओ शेअर केले आहेत. ज्यामध्ये भूकंपामुळे घरातील साहित्य थरथरत होते. भूकंपामुळे जीवित व मालमत्तेचे नुकसान झाल्याची अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध नाही.