भारताला जगातील उच्च शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र बनविण्यासाठी केंद्र सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. विदेशातील विद्यार्थ्यांचा भारतातील ओढा वाढण्यासाठी केंद्र सरकारने विदेशी विद्यार्थ्यांसाठी खास व्हिसाची घोषणा केली आहे. दोन श्रेणीतील व्हिसामुळे परदेशी विद्यार्थ्यांना भारतीय शिक्षण सुलभ होणार आहे.
देशातील शैक्षणिक संस्थांमध्ये विदेशी विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणासाठी कवाडे खुली होणार आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने ई स्टुडंट व्हिजा, ई स्टुडंट एक्स व्हिजा अशा दोन श्रेणींतील व्हिसाची घोषणा केली आहे.
विदेशातील विद्यार्थ्यांना ‘स्टडी इन इंडिया’ या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. ई स्टुडंट व्हिजा विद्यार्थ्यांसाठी तर ई स्टुडंट एक्स व्हिजा विद्यार्थ्यांसोबत येणारे आई-वडील अथवा पती, पत्नीसाठी असणार आहे.
पदविका, पदवी, पदव्युत्तर, पीएच.डी. आदी अभ्यासक्रमांसाठी विदेशी विद्यार्थ्यांनी भारतात यावे, यासाठी नवीन व्हिसाची योजना आखण्यात आली आहे. विदेशी विद्यार्थ्यांसाठी 600 हून अधिक शैक्षणिक संस्थांसोबत सामंजस्य करार करण्यात आले आहेत.
अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, व्यवस्थापन, कृषी, विज्ञान, कला, मानव्यशाखा, भाषा, विधी, पॅरा मेडिकल, योग, बौध अध्ययन आदी शाखांसह 800 अभ्यासक्रम विदेशी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.