File Photo
राष्ट्रीय

सरन्यायाधीश चंद्रचूड आहेत व्हिगन; जाणून घ्या शाकाहार आणि व्हिगनमधील फरक

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी गेल्या काही महिन्यांपासून व्हिगन (Vegam) आहार आणि जीवनशैलीचा स्वीकार केलेला आहे. चंद्रचूड यांनी स्वतःच ही माहिती दिली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या कँपसमधील रेस्टॉरंटचे उद्घाटन आणि डिजिटल लॉ रिपोर्टचे प्रकाशन या कार्यक्रमांवेळी त्यांनी ही माहिती दिली. स्वतःच्या मुलींपासून प्रेरणा घेऊन व्हिगन जीवनशैली स्वीकारल्याचे त्यांनी म्हटले आहे. (DY Chandrachud turns Vegan)

मुलींपासून प्रेरणा घेऊन व्हिगनचा स्वीकार

चंद्रचूड यांना दोन मुली आहेत. या मुली विशेष क्षमता असणाऱ्या (Specially Abled) आहेत. "मी जे काही करतो, त्यात मला मुलींकडून प्रेरणा मिळते. आपण कौर्यमुक्त जीवन जगले पाहिजे, असे माझ्या मुलींचे मत होते, त्यामुळे मी व्हिगन आहार आणि जीवनशैली स्वीकारली आहे. मी आता चामडे आणि रेशीम यांपासून बनलेल्या वस्तू वापरत नाही," असे ते म्हणाले. चंद्रचूड यांची पत्नीही व्हिगन आहेत, असे बार अँड बेंचने दिलेल्या बातमीत म्हटले आहे.

उच्च न्यायालयाच्या कँपसमधील हे रेस्टॉरंट विशेष व्यक्तींच्या वतीने चालवले जाणार आहे. "जेव्हा जेव्हा मी विशेष कौशल्य असणाऱ्या व्यक्तींच्या संपर्कात येतो तेव्हा माझ्या लक्षात येते की यांच्यात फार मोठी क्षमता आहे. दिल्ली उच्च न्यायालयातील हे रेस्टॉरंट एकमेव असणार नाही, ती एक चळवळ होईल. आम्ही सर्वोच्च न्यायालयात मिट्टी कॅफे सुरू केला आहे, त्याचे वकिलांना फार चांगले स्वागत केले," असे ते म्हणाले.

व्हिगन आणि शाकाहारमधील फरक | Difference between Vegan and Vegetarian

व्हिगन आहार पद्धती आणि जीवनशैलीमध्ये प्राणीजन्य सर्वच पदार्थ, वस्तू वापरण्याचे टाळले जाते. म्हणजे दूध, मध, रेशीम, चामड्याची उत्पादने व्हिगन व्यक्ती वर्ज्य करते. व्हिगन व्यक्ती फक्त वनस्पतीजन्य पदार्थांचा वापर आणि सेवन करतात. (Difference between Vegan and Vegetarian)

तर दुसरीकडे शाकाहारमध्ये मांसमच्छी, पॉल्ट्रीचे उत्पादने उदा. चिकन, अंडी यांचे सेवन वर्ज्य असते. शाकाहार करणारी व्यक्ती दूध, मध असे पदार्थ जेवणात घेतात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT