हैदराबाद; वृत्तसंस्था : तेलंगणाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हैदराबादेतील पोलिस कॉम्प्युटर सर्व्हिसेस विभागात कार्यरत पोलिस उपअधीक्षक संकी रेड्डी भीम रेड्डी यांच्या लाचखोरीचा पर्दाफाश केला. तेलंगणा व कर्नाटकातील रेड्डी याच्याशी संबंधित १६ ठिकाणांवर टाकलेल्या छाप्यांत तब्बल २०० कोटी रुपयांची मालमत्ता सापडली अन् छापा टाकणार्या अधिकार्यांचे डोळेच विस्फारले.
रेड्डी याने त्याच्या सेवाकाळात उत्पन्नाच्या कायदेशीर स्रोतांपेक्षा जास्त संपत्ती भ्रष्ट मार्गाने गोळा केल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली. अधिकाऱ्यांनी गुरुवारी सकाळपासून रेड्डी याचे नातेवाईक, मित्र, कथित बेनामीदार आणि इतर साथीदारांच्या एकूण १६ मालमत्तांवर छापे टाकले. या छाप्यांत तेलंगणा व कर्नाटकात पसरलेल्या अफाट स्थावर मालमत्तेची कागदपत्रे हाती लागली. तिचे बाजारमूल्य सुमारे २०० कोटी रुपये आहे. दरम्यान, सुमारे १५ कथित बेनामीदारांची नावे असलेली एक डायरीही अधिकाऱ्यांना सापडली.
अतिरिक्त मालमत्तेची पडताळणी अजूनही सुरू असून जंगम आणि स्थावर मालमत्तेचे एकूण मूल्य अद्याप निश्चित करायचे आहे, असे ‘एसीबी’च्या वतीने सांगण्यात आले. मात्र, या मालमत्तांचे बाजारमूल्य २०० कोटींहून जास्त असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. भीम रेड्डी यांनी यापूर्वी जडचेर्ला येथे पोलिस निरीक्षक (सीआय) आणि पटांचेरू येथे डीएसपी म्हणून काम केले होते. ‘एसीबी’ने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, १९८८ च्या कलम १३ (१) (बी) आणि १३ (२) अंतर्गत बेहिशेबी मालमत्तेचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
मालमत्ता : वेसेला मेडोजमधील व्हिला, पेंटहाऊससह तळमजला व दोन मजल्यांचे घर, ४ फ्लॅट, तळमजला व दोन मजल्यांच्या व्यावसायिक संकुलातील हिस्सा, ३,००० चौरस फुटांची व्यावसायिक जागा.
जमीन : प्रगती रिसॉर्टस्, नागोळे, पटांचेरू आणि मोमीनपेट येथे मोकळे भूखंड; जहिराबाद, मोमीनपेट, मुचिंतला, देवनहल्ली आणि कर्नाटकात इतर ४४ एकर शेतजमीन.
गुंतवणूक : श्री राघवेंद्र रॉक सँड मिनरल्समध्ये ७५ लाख रुपये.
जप्त रोकड : डीएसपीच्या घरातून ३.६ लाख रुपये; कथित बेनामीदाराच्या घरातून ४० लाख रुपये.
दागिने व मौल्यवान वस्तू : सुमारे २ किलो सोन्याचे दागिने आणि २० किलो चांदीच्या वस्तू.
बँक ठेवी : सुमारे १९.९१ लाख रुपये.
इतर जप्ती : २३ विदेशी दारूच्या बाटल्या.
मालमत्तांचे अंदाजित बाजारमूल्य : २०० कोटी रुपयांपेक्षा जास्त.