IndiGo flight news
दिल्ली : दिल्लीहून कोलकात्याला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात १ सप्टेंबर रोजी एका प्रवाशाने केबिन क्रूशी गैरवर्तन करत सहप्रवाशांना त्रास दिल्याची घटना घडली. विमानतळावर पोहोचताच संबंधित प्रवाशाला सुरक्षा अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आलं, अशी माहिती इंडिगोकडून देण्यात आली आहे.
प्रवाशी मद्याच्या नशेत होता आणि त्याला विमान वाहतूक नियमांनुसार “अनियंत्रित” घोषित करण्यात आलं. कोलकात्यात उतरल्यानंतर त्याच्यावर संबंधित अधिकाऱ्यांकडे औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली आहे. इंडिगोच्या प्रवक्त्यांनी सांगितलं, “१ सप्टेंबर २०२५ रोजी दिल्ली-कोलकाता मार्गावर असलेल्या इंडिगो 6E 6571 विमानप्रवासात एका प्रवाशाने मद्याच्या नशेत केबिन क्रूशी गैरवर्तन केलं आणि इतर प्रवाशांना त्रास दिला. त्याला अनियंत्रित घोषित करण्यात आले आणि विमान कोलकात्याला पोहोचल्यावर सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले." इंडिगोने स्पष्ट केलं की, "आम्ही कोणत्याही प्रकारच्या विघातक किंवा गैरवर्तनाबद्दल 'शून्य-सहनशीलता' धोरण राखतो आणि सर्व ग्राहक व कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित वातावरण सुनिश्चित करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत."
लेहमधील खराब हवामानामुळे या प्रदेशातील विमानसेवा विस्कळीत झाल्यानंतर दिल्ली विमानतळाने आज (दि. ३) प्रवाशांसाठी सूचना जारी केली. "लेहमधील खराब हवामानामुळे, विमानसेवा विस्कळीत झाली आहे. प्रवाशांना मदत करण्यासाठी आणि गैरसोय कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. विमान उड्डाण माहितीसाठी एअरलाइनशी संपर्क साधा," असे सोशल मीडियावर दिल्ली विमानतळाने म्हटले आहे.