बांदा : उत्तर प्रदेशच्या बांदा जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने दारूच्या नशेत चक्क एका सापाला पकडून दातांनी चावून त्याचे तुकडे-तुकडे केले. या घटनेनंतर तरुणाची प्रकृती अत्यंत गंभीर असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बबेरू कोतवाली परिसरातील हरदौली गावातील रहिवासी अशोक हा व्यवसायाने मजूर आहे. तो रात्री दारूच्या नशेत घरी परतला. घरात त्याला एक साप दिसला. नशेत असलेल्या अशोकने साप पकडला आणि त्याला दातांनी चावून चावून त्याचे तुकडे-तुकडे केले. या झटापटीत सापानेही अशोकला अनेक ठिकाणी दंश केला, ज्यामुळे तो काही वेळातच बेशुद्ध पडला.
हा थरार अशोकच्या आईने पाहिला आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली. कुटुंबीयांनी तातडीने प्रसंगावधान दाखवत सापाचे उरलेले अवशेष एका पिशवीत भरले आणि बेशुद्ध अशोकला घेऊन बबेरू येथील स्थानिक आरोग्य केंद्राकडे धाव घेतली. तेथील डॉक्टरांनी अशोकची गंभीर स्थिती पाहून आणि घटनेचे स्वरूप ऐकून त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. माणसाने सापाला चावून जखमी झाल्याची घटना ऐकून अनुभवी डॉक्टरही चक्रावून गेले.
जिल्हा रुग्णालयात अशोकवर उपचार सुरू करण्यात आले. डॉक्टरांनी सांगितले की, सुदैवाने तो साप विषारी नव्हता, त्यामुळे अशोकचा जीव वाचला. जर साप विषारी असता, तर परिस्थिती अत्यंत गंभीर झाली असती. सध्या अशोकची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दारूच्या व्यसनामुळे माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो, हे या घटनेने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. डॉक्टरांनी सांगितलं की, 'सुदैवाने साप विषारी नव्हता, त्यामुळे तो वाचला. सध्या अशोकची प्रकृती स्थिर आहे.
ही बातमी वाऱ्यासारखी गावात आणि परिसरात पसरली. या विचित्र घटनेने केवळ गावकरीच नव्हे, तर वैद्यकीय कर्मचारीही अचंबित झाले आहेत. डॉक्टरांनी या घटनेला 'अत्यंत दुर्मिळ आणि धोकादायक' म्हटले आहे.