नवी दिल्ली : दक्षिण दिल्लीतील वसंत विहार परिसरात एका मद्यधुंद चालकाने मध्यरात्री आपल्या आलिशान गाडीने फुटपाथवर झोपलेल्या पाचजणांवर गाडी घालून त्यांना गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण अपघातात एका आठ वर्षांच्या मुलीसह दोन जोडप्यांचा समावेश असून सर्वजण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी चालकाला अटक केली आहे.
ही घटना 9 जुलैच्या रात्री 1.45 वाजता वसंत विहार येथील शिवा कॅम्पच्या समोरील फुटपाथवर घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी पाचही जण रस्त्याच्या कडेला झोपलेले होते. चालक उत्सव शेखर (वय 40, रहिवासी द्वारका, दिल्ली) याने आपल्या गाडीने अचानक रस्ता सोडून फुटपाथवर घुसून सर्वांवर गाडी घातली. अपघाताच्या वेळी उत्सव शेखर हा मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता, हे वैद्यकीय चाचणीत स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींमध्ये लाधी (40), बिमला (8, लाधीची मुलगी), सबामी उर्फ चिर्मा (45, लाधीचा पती), रामचंद्र (45), नारायणी (35, रामचंद्र यांची पत्नी) यांचा समावेश आहे. हे सर्वजण राजस्थानमधून आलेले होते आणि उपजीविकेसाठी दिल्लीतील शिवा कॅम्प भागात वास्तव्यास होते.