नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया पवन ठाकूर याच्या दुबईत मुसक्या आवळल्या असून त्याला भारताकडे प्रर्त्यार्पित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पवन ठाकूरवर अलीकडच्या वर्षांतील भारतात अमली पदार्थांच्या दोन सर्वात मोठ्या कन्साईन्मेंट आणल्याचा आरोप आहे. त्याला लवकरच भारतात प्रत्यार्पित केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय तस्करी आणि मनी लाँडरिंग सिंडिकेट उद्ध्वस्त करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.
नार्केाटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) आणि अंमलबजावणी संचलनालय (ईडी) यांच्या रडारवर असलेला ठाकूर सुमारे 82 किलो उच्च-दर्जाच्या कोकेनच्या (अंदाजित किंमत 2,500 कोटी) तस्करीचा मुख्य सूत्रधार असल्याचे बोलले जाते. नोव्हेंबर 2024 मध्ये दिल्लीत ही खेप पकडण्यात आली होती. या आठवड्यात दिल्लीत एनसीबीने जप्त केलेल्या 282 कोटी रुपये किमतीच्या मेथॅम्फेटामाईन जप्तीशीही त्याचा संबंध आहे. अधिकाऱ्यांनी ठाकूरला दोन्ही ऑपरेशन्सचे समन्वय साधणारा मध्यवर्ती व्यक्ती म्हणून वर्णन केले आहे. तो दुबईतून आपले जाळे चालवत होता. ते भारत, चीन, सिंगापूर, हाँगकाँग आणि यूएईमध्ये पसरलेले आहे. ईडीने समांतर मनी लाँडरिंग तपास करत बनावट आयात-निर्यात कागदपत्रे, क्रिप्टोकरन्सी आणि बोगस कंपन्यांद्वारे 681 कोटींहून अधिक रक्कम वळवल्याचा आरोप त्याच्या सिंडिकेटवर ठेवला आहे.
एनसीबीने इंटरपोलच्या मदतीने सप्टेंबरमध्ये त्याच्या विरुद्ध सिल्व्हर नोटीस जारी केली होती. त्यामुळे जागतिक संस्थांना त्याच्या मालमत्तांचा आणि आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेता आला. भारताने केलेल्या विनंतीनंतर या प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय स्वरूप आणि गंभीरतेमुळे त्याचे प्रत्यार्पण लवकर होण्याची शक्यता आहे. भारतात परत आणल्यावर त्याला अमली पदार्थ कायदा आणि मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत खटल्याला सामोरे जावे लागेल.