नवी दिल्ली; वृत्तसंस्था : लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी डॉ. उमर-उन-नबी याचा महत्त्वाचा साथीदार जासीर बिलाल वाणी याला राष्ट्रीय तपास संस्थेने अटक केली आहे. सोमवारी (17 नोव्हेंबर) श्रीनगर येथून त्याला अटक करण्यात आली आणि आज त्याला 10 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. या स्फोटात 15 लोकांचा बळी गेला होता.
प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू बजाज चांदना यांनी च्या कोठडीच्या मागणीला मंजुरी दिली. सुनावणी इन कॅमेरा असल्याने प्रसारमाध्यमांना कोर्ट परिसरात प्रवेश दिला नव्हता. जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील काझीगुंडचा रहिवासी असलेला आरोपी जासीर, हा हल्ल्याचा सक्रिय साथीदार आणि सहसूत्रधार होता. त्याने कथित दहशतवादी उमर-उन-नबी याच्यासोबत जवळून काम केले आणि हल्ल्याची योजना आखली. त्याने हल्ल्यापूर्वी ड्रोनमध्ये बदल करून तांत्रिक सहाय्य पुरवले होते, रॉकेट बनवण्याचा प्रयत्नही केला होता.