नवी दिल्ली; वृत्तसंस्था : होर्मुझ सामुद्रधुनीजवळ रविवारी ओमानमधील सोहर बंदरानजीक निकाराग्वाचा ध्वज असलेल्या एमटी पेट्रो डॉल्फिन या टँकरवर ड्रोन हल्ला झाला. या जहाजावरील ११ भारतीय खलाशांपैकी नऊ जणांना सुरक्षित वाचविण्यात आले असून, अन्य दोन खलाशी अद्याप बेपत्ता आहेत. हल्ल्यामागील घटकांची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने व्यापारी जहाजांवरील हल्ल्यांचा निषेध केला आहे. सर्व संबंधित पक्षांनी तणाव कमी करून व्यापारी जहाजे, खलाशी आणि नागरी ठिकाणांवरील हल्ले तातडीने थांबवावेत, असे भारताने म्हटले आहे.
गेल्या तीन दिवसांत भारतीय खलाशी कार्यरत असलेल्या तीन जहाजांना लक्ष्य करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. रविवारीच मार्शल आयलँडचा ध्वज असलेल्या एमटी वाल्थेरा या टँकरवरही ड्रोन किंवा क्षेपणास्त्राद्वारे हल्ला झाल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यानंतर जहाजावर आग लागली. या जहाजावरही ११ भारतीय खलाशी कार्यरत होते. ९ ऑक्टोबर रोजी एमटी जेम नंबर २ या जहाजावर हल्ला झाला.
केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय अधिकारी स्थानिक यंत्रणांच्या मदतीने बेपत्ता खलाशांचा शोध घेत आहेत. मस्कत येथील भारतीय दूतावास संबंधित अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून, परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.