Driving Licence Cancellation | वाहतूक नियम मोडल्यास आता ड्रायव्हिंग लायसन्स होणार रद्द  
राष्ट्रीय

Driving Licence Cancellation | वाहतूक नियम मोडल्यास आता ड्रायव्हिंग लायसन्स होणार रद्द

केंद्र सरकार आणतेय ‘ग्रेडेड पॉईंटस्‌ सिस्टीम’ : केंद्रीय महामार्गमंत्री नितीन गडकरींची मोठी घोषणा

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली; वृत्तसंस्‍था : वारंवार वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेपर्वा वाहनचालकांना चाप लावण्यासाठी केंद्र सरकार आता कठोर पावले उचलत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी वाहन परवान्यासाठी (ड्रायव्हिंग लायसन्स) लवकरच ‘ग्रेडेड पॉईंटस्‌-बेस्ड सिस्टीम’ लागू करण्यात येणार असल्याची माहिती दिली. या नव्या नियमांनुसार, वारंवार वाहतूक नियम मोडल्यास चालकाचा परवाना निलंबित किंवा कायमचा रद्द केला जाऊ शकतो.

६६ व्या ‘सियाम’ (SIAM) वार्षिक परिषदेत बोलताना गडकरी म्हणाले की, रस्ते सुरक्षेसाठी चालकांच्या वर्तनात सुधारणा होणे अत्यंत आवश्यक आहे. नव्या प्रणालीनुसार, प्रत्येक वाहतूक उल्लंघनावर चालकाच्या खात्यावर पेनल्टी पॉईंटस्‌ जमा होतील. ठरावीक मर्यादेपेक्षा जास्त पॉईंटस्‌ जमा झाल्यास परवाना जप्त किंवा रद्द केला जाईल. दुसरीकडे, चांगला ट्रॅक रेकॉर्ड असणाऱ्या चालकांना विमा कंपन्यांकडून विविध सवलती आणि प्रोत्साहन दिले जाईल.

‘भारत NCAP २.०’ लवकरच

अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार ऑक्टोबर २०२७ पासून ‘भारत NCAP २.०’ हा नवीन सुरक्षा मूल्यांकन उपक्रम लागू करणार आहे. या अंतर्गत वाहनांच्या संपूर्ण सुरक्षा संरचनेची अधिक काटेकोर तपासणी केली जाईल.

बीएस-४ वाहनांसाठी नवीन प्रदूषण नियंत्रण उपकरण

बीएस-४ (BS IV) वाहनांमधून होणारे घातक उत्सर्जन कमी करण्यासाठी गडकरी यांनी नव्या योजनेची घोषणा केली. सुमारे ४,००० ते ५,००० रुपये किमतीचे नवीन ‘एमिशन-कंट्रोल डिव्हाईस’ विकसित करण्यात आले असून त्याच्या चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. हे यंत्र जुन्या बीएस-४ वाहनात बसवल्यास त्यातील उत्सर्जन थेट बीएस-६ वाहनांच्या पातळीइतके कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT