Indian Ocean | हिंदी महासागराच्या तळाशी भारताची ‘गुप्त नजर’ 
राष्ट्रीय

Indian Ocean | हिंदी महासागराच्या तळाशी भारताची ‘गुप्त नजर’

डीआरडीओकडून युफॉस पाणबुडीविरोधी नेटवर्कची तयारी; समुद्राखालील हालचालींवर २४ तास लक्ष

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : हिंदी महासागरात चीन आणि पाकिस्तानच्या वाढत्या प्रभावाला शह देण्यासाठी भारताने एक अत्यंत महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने भारताच्या सागरी हद्दीत फिरणाऱ्या शत्रूच्या पाणबुड्यांवर २४ तास पाळत ठेवण्यासाठी ‘अंडरवॉटर फायबर ऑप्टिक सेन्सिंग सिस्टीम’ विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी डीआरडीओने एका औद्योगिक भागीदाराचा शोध सुरू केला आहे.

कोची येथील 'नेव्हल फिजिकल अँड ओशनोग्राफिक लॅबोरेटरी' या डीआरडीओच्या प्रमुख प्रयोगशाळेने यासाठी 'एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट' जारी केले आहे. या प्रकल्पांतर्गत समुद्राच्या तळाशी सेन्सर नोड्सचे जाळे तयार केले जाईल, तेे उपसमुद्र फायबर-ऑप्टिक केबल्सद्वारे किनाऱ्यावरील स्टेशन्सशी जोडलेले असेल. तेथून समुद्राखालील सर्व डेटाचे विश्लेषण केले जाईल.

समुद्राच्या तळाशी सेन्सर बसवण्याची ही संकल्पना नवीन नाही. शीतयुद्धाच्या काळात अमेरिकेने सोव्हिएत पाणबुड्यांचा मागोवा घेण्यासाठी ‘सोसस’ नावाचे नेटवर्क वापरले होते. चीननेही दक्षिण चीन समुद्रात अशीच ‘अंडरवॉटर ग्रेट वॉल’ उभारली आहे. भारताची ‘युफोस’ प्रणाली एकदा कार्यान्वित झाल्यानंतर ती सलग २० वर्षे सेवा देईल आणि हा प्रकल्प पुढील ४८ महिन्यांत पूर्ण करण्याचे तात्पुरते उद्दिष्ट आहे.

१) २४ तास पाळत : जहाज व विमानांच्या तुलनेत हे सागरी तळावरील सेन्सर्स शत्रूच्या पाणबुड्यांवर कोणतीही विश्रांती न घेता २४ तास गुप्तपणे लक्ष ठेवतील.

२) ४८ महिन्यांचे लक्ष्य : हा अत्यंत गुप्त आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत प्रकल्प पुढील ४८ महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

३) २० वर्षांचे सेवा आयुष्य : एकदा तैनात केल्यानंतर हे अंडरवॉटर फायबर ऑप्टिक नेटवर्क सलग २० वर्षांपर्यंत कार्यरत राहू शकते.

४) १ सप्टेंबर ही अंतिम मुदत : या भव्य प्रकल्पासाठी कंपन्यांना आपले प्रस्ताव सादर करण्यासाठी १ सप्टेंबर २०२६ पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT