नवी दिल्ली; वृत्तसंस्था : दिल्लीतील लाल किल्ला बॉम्बस्फोटाचा मुख्य आरोपी डॉ. उमर नबीने देशभरात तरुणांना कट्टरतावादाकडे वळवण्यासाठी एक मोठे जाळे विणल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणाच्या केंद्रस्थानी इम्फाळमधील एका तरुणीचा समावेश असल्याचे समोर आले आहे. चौकशीदरम्यान, आपण डॉ. उमर नबीच्या संपर्कात असल्याचे या तरुणीने कबूल केले आहे.
विद्यार्थ्यांवर सत्रांसाठी दबाव
मिळालेल्या माहितीनुसार, उमर अनेक राज्यांमध्ये लोकांना कट्टरपंथी बनवण्यासाठी सक्रियपणे प्रयत्न करत होता. विशेषतः विद्यार्थी, कनिष्ठ सहकारी आणि भरकटलेले तरुण त्याच्या निशाण्यावर होते. तपासात असेही समोर आले आहे की, उमरने वरिष्ठ प्राध्यापक आणि शिक्षक म्हणून आपल्या पदाचा गैरवापर करून विद्यार्थ्यांना त्याच्या अनौपचारिक सत्रांना उपस्थित राहण्यासाठी दबाव टाकला.
इम्फाळमधील तरुणीचा नेमका प्रकार काय?
न्यूज रिपोर्टनुसार, इम्फाळची ही तरुणी उमरच्या संपर्कात होती. तिला आमिष दाखवून तिचे धर्मांतर करण्यात आले आणि मरियम अशी नवी मुस्लिम ओळख देण्यात आली. सूत्रांच्या मते, हे नाव बदलणे एका सॉफ्ट कन्व्हर्जन आराखड्याकडे निर्देश करते, जे इस्लामी कट्टरतावादी संघटनांमध्ये अनेकदा वापरले जाणारे तंत्र आहे. यामध्ये लक्ष्याच्या मूळ ओळखीला बदलणे हे प्राथमिक उद्दिष्ट असते.
आदरापोटी ऐकले, पण विचार स्वीकारले नाहीत
या तरुणीने चौकशीदरम्यान सांगितले की, उमर हा एक वरिष्ठ प्राध्यापक असल्याने आदरापोटी ती त्याच्या बोलण्याकडे लक्ष देत होती. मात्र आपण त्याचे विचार कधीही गांभीर्याने घेतले नाहीत. केवळ आदरापोटी त्याच्या सत्रांना उपस्थित राहिल्याचे तिने स्पष्ट केले आणि त्याची विचारसरणी कधीही स्वीकारली नाही, असेही तिने सांगितले. या खुलाशामुळे डॉ. उमरच्या कट्टरतावादी जाळ्याची व्याप्ती आणि त्याच्या कार्यपद्धतीवर नव्याने प्रकाश पडला आहे.